राज्यात महाआघाडी साथ-साथ;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:45 AM2021-08-13T04:45:20+5:302021-08-13T04:45:20+5:30

स्टार १०४४ लोकमत न्यूज नेटवर्क सागर गुजर सातारा : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून ...

The grand alliance simultaneously in the state; | राज्यात महाआघाडी साथ-साथ;

राज्यात महाआघाडी साथ-साथ;

Next

स्टार १०४४

लोकमत न्यूज नेटवर्क

सागर गुजर

सातारा : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यामध्ये सत्तेत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असली तरी वरिष्ठ पातळीवर आघाडी टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. सातारा जिल्ह्यात मात्र या तिन्ही पक्षांची पाठीला पाठ असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायतींसह बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने इतर सर्व पक्षांशी संघर्ष करून हे वैभव मिळविले आहे. निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना असाच संघर्ष झालेला आहे. आता राज्याच्या सत्तेत वरिष्ठ नेते एकत्र आले असले तरी स्थानिक नेतेमंडळींमध्ये पक्षीय निष्ठा प्रचंड आहे, तसेच सत्तेत असलेला पक्ष आपल्या अपेक्षा पूर्ण करत नसल्याचे शल्यही या नेत्यांना बोचत असल्याने आगामी काळामध्ये संघर्ष अटळ असल्याचे चित्र आहे.

१) पंचायत समिती

जिल्ह्यामध्ये ११ पंचायत समिती आहेत. १२८ सदस्य येथे कार्यरत आहेत. राष्ट्रवादीचे ७६, काँग्रेसचे १६, शिवसेनेचे ९ सदस्य असले तरीदेखील बहुतांश पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. या सर्व ठिकाणी सत्ताधारी राष्ट्रवादी विरोधात काँग्रेस आणि शिवसेना असेच चित्र पाहायला मिळते.

२) जिल्हा परिषद

सातारा जिल्हा परिषदेचे एकूण ६४ सदस्य आहेत. यामध्ये ४१ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे असून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व आहे. काँग्रेसचे १०, तर शिवसेनेचे ४ सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता कायम आहे. अजूनही काँग्रेस, शिवसेना विरोधाचे सूर आळवत असतात.

३) सातारा पालिका

सर्वच सत्तास्थानांवर राष्ट्रवादीचे प्राबल्य असले तरी सातारा जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या सातारा नगरपालिकेत व्यक्तिकेंद्रित राजकारण पहायला मिळते. सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा देखील पक्ष चिन्हावर त्यांनी निवडणूक लढली नव्हती. पालिकेत शिवसेनेचे अस्तित्व पाहायला मिळत नाही.

४) तीन पक्ष, तीन विचार

जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तसेच सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांच्यात मोठ्या लढती झाल्या आहेत. भाजप विरोधाचा नारा देत आहे. आगामी काळामध्ये निवडणुकांचे धुमशान होणार आहे, त्यासाठी तीन पक्षांचे एकमत पाहायला मिळत नाही.

कोट...

राज्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचा जो निर्णय असेल त्यांच्याशी चर्चा करून संख्याबळ जास्त आहे. राजकीय परिस्थिती बघितली तर पवार साहेबांवर प्रेम करणारा जिल्हा आहे. जिल्ह्यातील लोक अजित पवारांच्या पाठीशी राहतात. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रश्न वेगळे आहेत. आमचा भाजप पक्ष शत्रू नंबर एक आहे. त्यांना रोखण्यासाठी ज्या तडजोडी कराव्या लागतील, त्या केल्या जातील.

सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.

कोट..

जिल्ह्यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन शिवसेना पक्ष कायमच लढत आला आहे. शिवसेना हा राज्यातील प्रमुख पक्ष बनला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल भक्कमपणे सुरू आहे. त्यामुळे पक्ष प्रमुख जो निर्णय घेतील, तो निर्णय आम्ही अमलात आणणार आहोत. जिल्हा परिषद, पंचायत समितीत निर्णय झालेला नाही. मित्रपक्ष सोबत असले तरी त्यांच्याकडे आम्ही काही मागायला जाणार नाही.

चंद्रकांत जाधव, जिल्हाप्रमुख शिवसेना

कोट...

तिन्ही पक्ष एकत्र यावेत असे वाटत असेल तरी एकत्रित निर्णय घेतले जात नाहीत. निवडणुकीत आघाडी केली की पुन्हा जो पक्ष सत्तेत येतो तो विचारत नाही. काँग्रेस पक्ष इतरांना सन्मानाने वागवतो, तीच अपेक्षा मित्रपक्षांकडून देखील आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष स्वबळावर लढण्याचा नारा देत आहेत. जिल्ह्यातील १५ ते २० गटांमध्ये काँग्रेसचे चांगले बळ आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी काळात निश्चितपणे यश मिळवू.

डॉ. सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

(सुनील माने, चंद्रकांत जाधव, सुरेश जाधव यांचे आयकार्ड फोटो वापरावेत)

Web Title: The grand alliance simultaneously in the state;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.