दीड एकरात बाराशे प्रेक्षकांचे भव्य सभागृह
By admin | Published: March 22, 2015 11:01 PM2015-03-22T23:01:08+5:302015-03-23T00:35:41+5:30
दहा कोटींची तरतूद : चार महिन्यांत होणार लोकार्पण; आणखी निधीची आवश्यकता--जिल्हा परिषदेतून
जगदीश कोष्टी -सातारा : यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीअंतर्गत विकासकामांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या शंभर कोटीपैकी दहा कोटी सातारा जिल्हा परिषदेला मिळाले आहेत. त्यातून दीड एकर जागेत वातानुकूलित यशवंतराव चव्हाण सभागृह उभारण्यात येत आहे. हे सभागृह जिल्ह्यातील सर्वात मोठे अत्याधुनिक बनविण्याचा जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा मानस आहे.
सातारा शहर सांस्कृतिकनगरी म्हणून नावारूपास येत आहे. मात्र, अत्याधुनिक सभागृह, मोठ्या संख्येने प्रेक्षक एकाचवेळी बसतील, असे सभागृह जिल्ह्यात नसल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या संयोजकांची गैरसोय होत होती. जिल्ह्याची सांस्कृतिक भूक भागविण्याचे हेरून यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी अंतर्गत राज्य शासनाच्या शंभर कोटींतून मिळालेल्या दहा कोटींतून यशवंतराव चव्हाण सभागृह बांधण्यात येत आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने व जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा शशिकला पिसाळ व उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नातून वर्षापूर्वी या सभागृहाचे भूमिपूजन झाले आहे. जून ते जुलैपर्यंत हे सभागृह सातारकरांच्या सेवेत हजर होऊ शकते. यामध्ये बाराशे लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या प्रकल्पासाठी कोटी रुपये मंजूर झाले असले तरी आणखी दहा कोटींची गरज आहे. यासाठी पालकमंत्री विजय शिवतारेंसह राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत आहेत.