नातवाच्या डीग्री फीसाठी आजीने विकल्या टोप्या !
By admin | Published: October 3, 2016 11:57 PM2016-10-03T23:57:48+5:302016-10-04T01:01:15+5:30
शेख कुटुंबाने बसस्थानकात काढली रात्र
सातारा : मूळचे सोलापूरमधील शास्त्रीनगरमध्ये वास्तव्यास असलेले शेख कुटुंबीय केवळ नातवाच्या शिक्षणासाठी पुण्यात गेले. नातवाचा डिप्लोमा पूर्ण झाला. मात्र घरची परिस्थिती हलाखीची अन् डीग्रीची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने मराठा समाजाच्या महामोर्चामध्ये टोप्या विकल्या तर हातभार लागेल, ही आशा बाळगून शेख कुटुंबीय मंगळवारी रात्रीच साताऱ्यात डेरेदाखल झाले. अख्खी रात्र बसस्थानकात कशीतरी काढून सकाळी बसस्थानकासमोरच ‘मराठा क्रांती मोर्चा’ लिहिलेल्या टोप्या त्यांनी विकल्या. वृद्धापकाळाकडे झुकलेल्या या आजीने नातवाच्या शिक्षणासाठी केलेला आटापिटा समाजाला दिशा देणारा ठरला आहे.
रसुलबी शेख (वय ६५) या मूळच्या सोलापूर येथील शास्त्रीनगरमध्ये राहणाऱ्या. त्यांना तीन मुले. एक रिक्षा चालक, दुसरा पाळणा चालवितो आणि तिसरा पेंटिंगचे काम करतो. सोलापूरमध्ये वास्तव्यास असताना रसुलबी शेख घरकाम करत होत्या. मात्र, काही महिन्यांपूर्वीच त्यांचा नातू सोहेल याने अभियांत्रिकीचा डिप्लोमा पूर्ण केला. घरात त्याच्याएवढं कोणी शिकलं नाही, त्यामुळे त्याला डीग्रीचं पुढचं शिक्षण मिळावं, अशी आमच्या कुटुंबाची इच्छा होती. त्यामुळे आम्ही पुण्यात त्याच्या शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. डीग्रीची फी तर भरायचीच आहे. मात्र, कॉलेजच्या खर्च परवडणारा नसल्याने त्याला आर्थिक हातभार लागावा म्हणून आम्ही महामोर्चामध्ये टोप्या विकण्याचा निर्णय घेतला.
पुण्यातील मोर्चामध्ये आम्हाला हे सुचले नाही. मात्र, सोहेलची फी लवकरच भरायची असल्याने आम्ही साताऱ्यातील महामोर्चामध्ये काहीतरी विकायचं, असं ठरवलं. असं रसुलबी शेख भावनाविवश होऊन सांगत होत्या.
मंगळवारी रात्री आठ वाजताच मी आणि माझा भाऊ साताऱ्यात आलो. साताऱ्यात आमचे कोणीही नातेवाईक नाहीत. त्यामुळे आम्ही बसस्थानकातील बाकड्यावर अख्खी रात्र काढली. डासांनी अक्षरश: फोडून काढलं. त्यामुळे झोपही फारशी लागली नसल्याचे रसुलबी यांनी सांगितले.
रसुलबी आणि त्यांच्या भावाने सकाळी आठ वाजता बसस्थानक परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी टोप्या विकण्यास सुरुवात केली. एक टोपी दहा रुपयांना ते विकत होते. दुपारपर्यंत त्यांच्या टोप्या बऱ्याच विकल्या गेल्या होत्या. या टोप्यांच्या विक्रीतून रसुलबी शेख यांना नातवाची संपूर्ण फी भरता येईल की नाही, याची शाश्वती देता येत नसली तरी त्यांनी या वयातही नातवाच्या शिक्षणाची उचललेली जबाबदारी इतरांना खरोखरच प्रेरणादायी ठरणारी आहे. (प्रतिनिधी)