Satara Crime: मोफत साडी मिळण्याचा मोह आजीबाईंना भोवला, दोघा भामट्यांनी गंडा घातला
By दत्ता यादव | Published: February 13, 2023 03:51 PM2023-02-13T15:51:04+5:302023-02-13T15:53:54+5:30
..म्हणजे ते शेठ तुम्हाला साडी देतील.
सातारा : ‘तुम्ही गरीब दिसाल म्हणजे ते शेठ तुम्हाला साडी देतील. यासाठी तुमच्या गळ्यातील बोरमाळ काढून द्या, असे म्हणताच वृद्धेने बोरमाळ काढून दिली. मात्र, रुमालामध्ये बोरमाळ बांधण्याचे नाटक करत दोघा भामट्यांनी बोरमाळ लंपास करून वृद्धेला गंडा घातला. ही घटना राजवाडा परिसरातील सुमित्राराजे संकुल परिसरात रविवार, दि. १२ रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनंदा उद्धव इंदलकर (वय ७०, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) या रविवारी दुपारी राजवाड्यावर आल्या होत्या. त्यावेळी तेथे दोन तरुण आले. त्यातील एका तरुणाने त्यांच्याशी ओळख वाढविण्याचा प्रयत्न केला. तो तरुण त्यांना म्हणाला, ‘एक दुकानदार आहे. त्याला दहा वर्षांनी मुलगा झाला आहे. त्या बाळाला आशीर्वाद दिला तर ते शेठ साडी वगैरे दान देतात. पण तुमच्या गळ्यात सोन्याची बोरमाळ आहे. त्यामुळे ते तुम्हाला साडी देणार नाहीत. तुम्ही गरीब दिसायला हवे. यासाठी गळ्यातील बोरमाळ काढा,’ असं त्यानं सांगितलं.
त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुनंदा इंदलकर यांनी बोरमाळ काढून त्या तरुणाच्या हातात दिली. त्या तरुणाने बोरमाळ पर्समध्ये ठेवण्याचे नाटक करत हातचलाखी करून लंपास केली. काही वेळानंतर दोघेही तरुण तेथून पसार झाले. इंदलकर यांनी पर्समध्ये बोरमाळ आहे का, हे पाहिले असता बोरमाळ नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मोफत साडी मिळण्याचा माेह इंदलकर यांच्या चांगलाच अंगलट आला. या प्रकरणाचा तपास हवालदार तावरे हे करीत आहेत.