आजी-माजी शिक्षक साकारताहेत कवठेत स्वागत कमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:39 AM2021-04-21T04:39:00+5:302021-04-21T04:39:00+5:30
वेळे : कवठे हे वाई तालुक्यातील राजकीय व सामाजिक दृष्टिकोनाने मोठे गाव. परंतु गावाच्या वेशीवर स्वागत कमान नाही, ही ...
वेळे : कवठे हे वाई तालुक्यातील राजकीय व सामाजिक दृष्टिकोनाने मोठे गाव. परंतु गावाच्या वेशीवर स्वागत कमान नाही, ही बाब कवठे गावातील आजी-माजी शिक्षकांच्या ध्यानात आल्याने त्यांनी गावाच्या वेशीवर स्वागत कमान बांधण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या.
गावातील सर्व आजी व माजी शिक्षक, तसेच कवठे गावातील माहेरवाशिणींनी एकत्रित येऊन गावाच्या वेशीवर विशाल प्रवेशद्वार बनविण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी प्राथमिक चर्चा केली. यानुसार या प्रवेशद्वाराची रचना तयार करण्यात आली. या प्रवेशद्वाराच्या कामाचे भूमिपूजन १३ मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी करण्याचे कवठे ग्रामस्थांतर्फे नियोजित केले आहे.
आरसीसी व मार्बलमध्ये या कमानीचे काम करण्यात येणार आहे. या कमानीसाठी अंदाजे ६ ते ७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कवठे येथे स्थायिक असलेल्या आजी व माजी शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने या प्रवेश कमानीसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये स्वखुशीने देणगी स्वरूपात दिले आहेत. त्यामुळे चार लाखांपर्यंतची रक्कम जमा झाली आहे.
सध्या कोरोनाच्या उद्रेकामुळे कवठे गावातील परगावी असलेल्या आजी, माजी शिक्षक, तसेच माहेरवाशिणींची भेट घेणे योग्य नसल्याने परगावी असलेल्या आजी, माजी शिक्षक व शिक्षकेतर व्यक्तींना या प्रवेशद्वारासाठी देणगी द्यायची असेल, त्यांनी माधवराव डेरे, चंद्रकांत ससाणे, जयवंत निकम व लक्ष्मण कांबळे या शिक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.