दादा-आबा सावधपणे ऐका सभासदांच्या हाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:39 AM2021-03-18T04:39:34+5:302021-03-18T04:39:34+5:30

सागर गुजर लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना हा देशातील नावाजलेला कारखाना आहे. ...

Grandparents, listen carefully to the calls of the members | दादा-आबा सावधपणे ऐका सभासदांच्या हाका

दादा-आबा सावधपणे ऐका सभासदांच्या हाका

Next

सागर गुजर

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना हा देशातील नावाजलेला कारखाना आहे. या कारखान्याला भूगोल आणि इतिहास दोन्ही आहेत. स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल घेऊन ब्रिटिश राजवटीविरोधात त्वेषाने लढलेल्या दिवंगत यशवंतराव चव्हाण, देशभक्त किसन वीर यांनी या कारखान्याचा पाया रचलाय... हा पाया खचू द्यायचा नसेल अन्‌ किसन वीरांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर हा कारखाना वाचवायलाच हवा. ‘दादा-आबा सावधपणे ऐका सभासदांच्या हाका’, अशी आर्त साद शेतकरी घालताना दिसत आहेत.

दिवंगत यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब शिंदे, आबासाहेब वीर यांनी भुईंजच्या माळावर साखर कारखाना उभारायचे स्वप्न पाहिले. १ ऑक्टोबर १९६८ मध्ये राज्य शासनाचे तर ७ ऑगस्ट १९६९ मध्ये केंद्र शासनाकडून कारखान्याला औद्योगिक परवाना मिळाला. यासाठी विनायकराव पाटील, पी. के. सावंत, राजारामबापू पाटील, माजी खासदार प्रतापराव भोसले यांच्या सकारात्मक विचारांतून हा कारखाना उभा राहिला. या नेत्यांनी शासनामध्ये असलेली राजकीय ताकद वापरली ती शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी! पुढे दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांनी देखील या कारखान्यासाठी मोठे योगदान दिले.

या नेत्यांनी धोम धरण, कण्हेर धरण उभारणीसाठी अविश्रांत प्रयत्न केले. वाई, खंडाळा, कोरेगाव, सातारा, जावळी या तालुक्यांतील शेती ओलिताखाली आणली. अनेक प्रश्न असतानाही त्यांची सोडवणूक सकारात्मक ऊर्जेतून करत या तालुक्यांतील शेती हिरवीगार केली. या तालुक्यांना उसाचा बेल्ट म्हणून ओळख सर्वत्र झाली. तालुक्यांचे नुसते नाव घेतले तरी सधन शेतकरी हे चित्र संपूर्ण देशातील लोकांपुढे आजही उभे राहते. आपल्या नेत्यांच्या प्रयत्नांना साद देत शेतकऱ्यांनी देखील मेहनत घेऊन ऊस शेती सुरू केली अन्‌ आजच्या घडीला या भागातील ऊस हे प्रमुख पीक आहे.

सध्या कारखाना मोठ्या अडचणींचा सामना करून सुरू आहे. शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळत नाहीत अन्‌ मिळाले तरी इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी मिळतात, अशी व्यथा शेतकरी व्यक्त करतात. मात्र, पैसे बुडत नाहीत... शेत पडीक ठेवण्यापेक्षा ऊस करायचा, तो आपल्या मालकीच्या कारखान्याला घालायचा, हा शिरस्ता शेतकऱ्यांनी सुरू ठेवलेला आहे. कारखानदारीत खासगीकरणाचे वारे वाहत असताना आपला कारखाना सुरू राहावा, या निर्मळ हेतूने शेतकरी ऊस उत्पादन घेतायत. आपल्याला परवडेल इतका दर मिळावा अन्‌ कारखाना वाचावा, एवढीच इच्छा शेतकऱ्यांची आहे. नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मुक्या हाका ऐकाव्यात, हीच त्यांची भावना आहे.

चौकट..

सभासद शेतकऱ्यांचा विचार करा

वाई, जावळी, सातारा, खंडाळा, कोरेगाव, महाबळेश्वर या सहा तालुक्यांतील ५२ हजार शेतकरी किसन वीर कारखान्याचे सभासद आहेत. महाबळेश्वर वगळता इतर पाच तालुक्यांत या कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी आहेत. सातारा, कोरेगाव तालुक्यांमध्ये साखर कारखाने असल्याने या तालुक्यांतील शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध असला तरी वाई, खंडाळा आणि जावळी तालुक्यातील सभासद शेतकरी हे किसन वीर कारखान्यावर अवलंबून आहेत. कारखान्याच्या अडचणी वाढल्या तर हे सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी पोळले जाणार आहेत. त्यामुळे त्यांचा विचार नेत्यांनी पहिल्यांदा करायला हवा, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

चौकट..

५२ वर्षांत एकदाच कारखाना बंद

किसन वीर साखर कारखान्यामध्ये १९६९-७० पहिला गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. त्यानंतर दुष्काळी परिस्थितीमुळे १९७३-७४ मध्ये उसाची उपलब्धता न झाल्याने कारखाना बंद ठेवावा लागला होता. त्यानंतर आजतागायत म्हणजे तब्बल ५२ वर्षे हा कारखाना ऊस गाळप करत आहे. राज्यातील नावाजलेल्या कारखान्यांच्या पंक्तीत किसन वीरचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. जावळीसाठी प्रतापगड कारखाना आणि खंडाळा तालुक्यासाठी खंडाळा कारखाना उपलब्ध आहे. मात्र, वाई तालुक्यातील आणि तालुक्याच्या सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांचा किसन वीर कारखाना हा श्वास आहे. इतर पिकांना कवडीमोल भाव मिळत असताना ऊस शेतीच्या आधारावर वाईमधील बहुतांश शेतकरी अवलंबून आहेत. कितीही अडचणी आल्या, उसाचा दर परवडत नसला तरी शेतकरी ऊस घेतोय. त्यात आंतरपीक लावून खर्चाचा ताळेबंद साधतोय.

लोगो : किसन वीर कारखाना वाचवा

१७ किसन वीर

Web Title: Grandparents, listen carefully to the calls of the members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.