आजोबांच्या बंबाला नातवाची कॉईल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:30 AM2021-05-30T04:30:07+5:302021-05-30T04:30:07+5:30
सातारा शहरातील शनिवार पेठेत राहणाऱ्या दत्तात्रय बळवंत पवार यांना त्यांच्या लग्नात भेट म्हणून बंब मिळाला. तब्बल सात दशकांपूर्वी ...
सातारा शहरातील शनिवार पेठेत राहणाऱ्या दत्तात्रय बळवंत पवार यांना त्यांच्या लग्नात भेट म्हणून बंब मिळाला. तब्बल सात दशकांपूर्वी घरात आलेला हा बंब ४० जणांच्या कुटुंबाला अंघोळीचे पाणी गरम करून देत होता. कालांतराने या कुटुंबातील भाऊ विभक्त झाले आणि दत्तात्रय पवार यांचा मुलगा पांडुरंग पवार यांच्या वाट्याला हा बंब आला. मुबलक प्रमाणात लाकूड उपलब्ध असल्याने याचा उपयोग चांगलाच झाला. एकाच वेळी साधारण पाचजणांच्या अंघोळीचे पाणी तापविणारा हा बंब दुसरी पिढी वापरत आहे.
अर्कशाळेत कार्यरत असलेल्या पांडुरंग पवार यांच्याकडे हा बंब आल्यानंतर त्यांच्या मातोश्री शकुंतला पवार यांनी त्याची निगा राखली. घराच्या परिसरात मिळणारा लाकूडफाटा गोळा करून त्यांनी हा बंब चालविला. त्यानंतर त्यांच्या स्नुषा रूपाली पवार यांनीही सासूबाईंना कित्ता गिरवत ही परंपरा अखंडित सुरू ठेवली; पण गेल्या काही वर्षांत लाकूड आणि त्यानंतर बंबफोड मिळणे अवघड झाले. सात दशकांच्या या सोबतीला रामराम करण्यापेक्षा इलेक्ट्रिकल्सची कामे करणाऱ्या पांडुरंग पवार यांना या बंबाला कॉईल बसविण्याची कल्पना सुचली. बंबाची कोणतीही रचना न बदलता त्यांनी कॉईल तयार केली आणि घरातील प्रत्येकाला वापरायला सोपा असा बंब तयार झाला.
वाढत्या शहरीकरणात घरे लहान अन् परडे तर गायब झाले. त्यामुळे बंब ठेवायचा आणि त्यात लाकूड जाळायचं म्हटलं की खोलीत काजळी ठरलेली. यावर उपाय शोधून सातारी स्पेशल जुगाडाने आधुनिक काळातील गिझर तयार केला.
पॉइंटर
एका वेळी होतंय पाच बादल्या पाणी गरम
विजेची होतेय बचत
विद्युत उपकरण असूनही धोका नाही
कुटुंबातील प्रत्येकाकडून सहज वापर
सात दशकांची खंबीर सोबत
कोट :
वडिलांच्या लग्नातील ही भेट आम्ही आजोबांची आठवण म्हणून जपली आहे. आई, पत्नी आणि आता लेकी या तिन्ही पिढ्यांचे बंबाबरोबरचे अनोखे नाते जपून आहेत. आधुनिकतेची कास धरणाऱ्या लेकींनाही हा बंब ‘ॲन्टिक’ वाटतो.
- पांडुरंग पवार, फुटका तलाव, सातारा
- प्रगती जाधव-पाटील