Satara: आजीचा जाळून खून करणाऱ्या नातवाला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:31 AM2024-08-14T11:31:59+5:302024-08-14T11:32:20+5:30

खोटी साक्ष देणाऱ्यावर न्यायालयाकडून कारवाईचे आदेश

Grandson sentenced to life imprisonment for burning grandmother to death in Satara | Satara: आजीचा जाळून खून करणाऱ्या नातवाला जन्मठेपेची शिक्षा

Satara: आजीचा जाळून खून करणाऱ्या नातवाला जन्मठेपेची शिक्षा

सातारा : जेवण का चांगले केले नाही, या कारणावरून गीताबाई मारुती साळुंखे (वय ७८, रा. राजापुरी, ता. सातारा) यांचा जाळून खून केल्याप्रकरणी त्यांचा नातू शरद बजरंग साळुंखे (वय ३६, रा. राजापुरी, ता. सातारा) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.

या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, राजापुरी येथे ११ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी नातू शरद साळुंखे याने आजी गीताबाई साळुंखे यांना ‘दुपारी तू जेवण का चांगले केले नाहीस’ असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर चुलीजवळ ठेवलेली राॅकेलची बाटली हातात घेऊन ‘तुला आता जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणत बाटलीतील राॅकेल आजीच्या अंगावर ओतले. आजी आरडाओरड करू लागली तरीही नातू शरद याने चुलीजवळची काडेपेटी घेऊन काडी ओढून आजीला पेटवून दिले. यामध्ये आजी गंभीर जखमी झाली. आजीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना आजीचा मृत्यू झाला. 

या प्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नातू शरद साळुंखे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांनी या खून प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरून न्यायालयाने शरद साळुंखे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सतीश राघू साळुंखे (रा. राजापुरी, ता. सातारा) याने न्यायालयात शपथेवर खोटी साक्ष दिली, हे निष्पन्न झाल्यानंतर न्यायालयाने त्याच्याविरुद्धही कारवाई करण्याचे आदेश दिले.

सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता वैशाली पाटील यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पोलिस प्राॅसिक्यूशन स्काॅडचे पोलिस उपनिरीक्षक सुनील सावंत, सहायक पोलिस फाैजदार शशिकांत गोळे, अरविंद बांदल, गजानन फरांदे, रहिनाबी शेख, अमित भरते यांनी सहकार्य केले.

Web Title: Grandson sentenced to life imprisonment for burning grandmother to death in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.