कठड्यांच्या जागी वाळूची पोती...

By admin | Published: February 19, 2015 09:37 PM2015-02-19T21:37:07+5:302015-02-19T23:48:58+5:30

सुरक्षा रामभरोसे : खंबाटकीजवळील ‘एस’ वळण ठरतेय वाहतुकीस धोकादायक

Granny's Grands In The Place Of The Clans ... | कठड्यांच्या जागी वाळूची पोती...

कठड्यांच्या जागी वाळूची पोती...

Next

खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर इंग्रजी एस आकाराच्या तीव्र वळणावर वारंवार अपघात होत असतात. आजपर्यंत अनेक अपघातांत शेकडो प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, या वळणावर आज तागायत कोणतेही संरक्षक कठडे उभारण्यात आलेले नाहीत. केवळ वळणावरील रस्त्याच्या दुतर्फा वाळूची पोती ठेवून दिशा दाखविण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणचा प्रवास अद्यापही धोकादायकच आहे. हायवे प्रशासनाच्या दुर्लक्षांमुळे खंबाटकीचा हा डेंजरझोन प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे.खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर घाटाला तीव्र वळण आहे. पुढे ‘एस’ आकाराचे वळण नवीन वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. उतारावरून येणारी वाहने वेगाने धावत असतात. साहजिकच वळणावर कधी-कधी वाहनावरील ताबा सुटून अपघात होत असतात. एखादा मोठा अपघात घडल्यावरच ‘न्हाय’च्या अधिकाऱ्यांचे व रस्त्याच्या ठेकेदारांचे डोळे उघडतात. तात्पुरती उपाययोजना केली जाते. मात्र, त्यानंतर मागचेच दिवस पुढे असतात. प्रवाशांच्या जीविताशी टांगती तलवार बनणारा हा खेळ थांबणार कसा, हाच एकमेव प्रश्न आहे. याकडे ना प्रशासन लक्ष देते ना ठेकेदार!
याच ‘एस’ आकाराच्या वळणावर आजपर्यंत जीपचा अपघातात नऊ जण, गुजरातमधील खासगी बसच्या अपघातात ११ जण, कारच्या अपघातात तीन जण, मोटारसायकल एक जण तसेच दोन महिन्यांपूर्वी ट्रक अपघातात दोन जण, कंटेनरच्या अपघातात दोघींना प्राण गमवावे लागले आहे. याशिवाय शेकडो प्रवासी जखमी होऊन कायमचे अपंगत्व झाले आहे. वास्तविक या वळणावरील अशास्त्रीय धोका नाहीसा करून संरक्षक यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. वास्तविक धोम-बलकवडीचा कॅनॉल पार केल्यानंतर वाहनांचा वेग कमी करण्यासंदर्भात उपाययोजना खूप महत्त्वाची आहे. यावर जर तोडगा निघाला तर अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी होण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)

प्राथमिक बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
मध्यंतरी ट्रकच्या अपघातानंतर या वळणावर केवळ रबर रिफ्लेक्टर स्ट्रीप बसविण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामुळे अपघात रोखण्यास कोणतीही मदत होत नाही. त्यामुळे ही यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. वास्तविक ‘एस’ वळणाच्या दोन्ही बाजूंने संरक्षक कठडे उभारले गेले पाहिजेत. शिवाय या वळणावरील छोट्या पुलालाही कठडे नाहीत. याच पुलाखाली बस पलटी झाली होती. याही ठिकाणी कठडे बांधणे आवश्यक आहे. मात्र, या प्राथमिक बाबींकडे हायवे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. एखादा अपघात घडल्यानंतर सुधारणा करण्यापेक्षा त्यापूर्वीच काळजी घेऊन उपयुक्त सुविधा करण्यात आल्या तर नाहक जीव तरी वाचतील, अशी चर्चा प्रवाशांमधून होत असते.

खंबाटकी बोगद्यानंतरचे धोके व एस वळणावरील अपुऱ्या सुविधा याबाबत नेहमी मागणी करण्यात आली. मात्र त्याची पूर्तता झाली नाही मात्र, आता सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यापर्यंत या अडचणी मांडणार असून, त्यावर तातडीने उपाययोजनना करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत.
- प्रदीप माने, उपजिल्हा प्रमुख शिवसेना

 

Web Title: Granny's Grands In The Place Of The Clans ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.