वराडे ट्रीटमेंट व ट्रांझिट सेंटरसाठी अनुदान मंजूर करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:25 AM2021-06-19T04:25:41+5:302021-06-19T04:25:41+5:30

सातारा : कऱ्हाड येथील वराडे येथे वन्यप्राणी यांच्यासाठी अद्ययावत ट्रीटमेंट व ट्रांझिट सेंटर मंजूर झाले असून, त्यासाठी साधारण ...

Grants should be sanctioned for Varade Treatment and Transit Center | वराडे ट्रीटमेंट व ट्रांझिट सेंटरसाठी अनुदान मंजूर करावे

वराडे ट्रीटमेंट व ट्रांझिट सेंटरसाठी अनुदान मंजूर करावे

Next

सातारा : कऱ्हाड येथील वराडे येथे वन्यप्राणी यांच्यासाठी अद्ययावत ट्रीटमेंट व ट्रांझिट सेंटर मंजूर झाले असून, त्यासाठी साधारण २ कोटी खर्च अपेक्षित आहे ते अनुदान मंजूर करावे. याबरोबरच बंदूक परवाने जे शेतीसाठी दिले गेले आहेत, वन्यजीव विभाग पीक नुकसानभरपाई ही त्वरित देत आहे तरी असे दिले गेलेले परवाने शासनाने पुनर्विचार करून शासनजमा करावे, अशी मागणी मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी बुधवारी राज्यातील मानद वन्यजीवरक्षकांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून थेट संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. यात साताऱ्यातील सुनील भोईटे आणि कऱ्हाडचे रोेहन भाटे यांनीही सहभाग नोंदवून मत मांडले. या वेळी बोलताना मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे म्हणाले, वन, वन्यजीव आणि पर्यावरणावरील प्रेम ही मानद वन्यजीवरक्षकांची खरी ओळख आहे. त्यांना त्यांच्या भागात कुठे जंगल आहे, कुठे कोणते वन्यजीव आहेत हे माहीत असते. त्यामुळे विकासकामे कुठे व्हावीत आणि कुठे होऊ नयेत याचेही उत्तम मार्गदर्शन ते करू शकतात.

मानद वन्यजीवरक्षक हे खरे वन्यप्रेमी असून ते जन आणि वन यांना सांधणारा महत्त्वाचा दुवा आहेत. मानव वन्यजीव संघर्ष कमी करून त्यांचे सहजीवन विकसित करण्यासाठी व्यापक जनजागृती करून हा संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजना शासनास सुचवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

नामशेष होत जाणाऱ्या प्रजातींचे संरक्षण करून त्यांचे संवर्धन करणे, नवीन प्रजातींचा शोध, या सगळ्याच गोष्टी पर्यावरणात महत्त्वाच्या असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी या वर्षी वृक्षारोपण करताना पशुपक्ष्यांची अन्नसाखळी मजबूत करणाऱ्या आणि स्थानिक वातावरणात रुजणाऱ्या आणि फुलणाऱ्या वृक्षांची बीजे ड्रोनच्या साहाय्याने डोंगरमाथ्यांवर तसेच माणसांचा कमी वावर असलेल्या ठिकाणी टाकण्यात येणार असल्याची माहिती या वेळी दिली. मानद वन्यजीव रक्षकांबरोबरचा हा संवाद यापुढेही सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

चौकट

प्रादेशिक वैशिष्ट्ये जपण्याची गरज

जंगलांवर उपजीविका अवलंबून असलेले लोक, बफर क्षेत्रात वस्ती करून राहत असलेले लोक त्यांच्या गरजांसाठी जंगलात जातात आणि त्यांच्यावर वन्यजीवांचे हल्ले होतात. त्यामुळे या नागरिकांना विविध विभागांच्या योजनांचा समन्वय साधून उपजीविकेसह इतर सुविधा त्यांच्या राहत्या ठिकाणी कशा उपलब्ध होतील याचा प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, निसर्गात वाघ, बिबटांप्रमाणेच अन्य पशुपक्षी- फुलपाखरे आणि इतर वन्यजीवही महत्त्वाचे असतात. त्यांची स्थानिक वैशिष्ट्येही असतात. या प्रादेशिक वैशिष्ट्यांसह हा निसर्ग जपण्याची आवश्यकता आहे, त्यादृष्टीनेही विचार करावा, मानद वन्यजीवरक्षकांनी यासंबंधीच्या सूचना विभागास द्याव्यात.

........

Web Title: Grants should be sanctioned for Varade Treatment and Transit Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.