नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच मिळणार द्राक्षाची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:43 AM2021-09-23T04:43:53+5:302021-09-23T04:43:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : मायणी व मायणी परिसरामध्ये यावर्षीच्या द्राक्ष हंगामास सुरुवात झाली असून, द्राक्ष बागायतदारांनी द्राक्षबागा छाटणीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : मायणी व मायणी परिसरामध्ये यावर्षीच्या द्राक्ष हंगामास सुरुवात झाली असून, द्राक्ष बागायतदारांनी द्राक्षबागा छाटणीस सुरुवात केली आहे. द्राक्ष झाडे छाटल्यापासून साधारण १२० दिवसांमध्ये द्राक्ष बाजारपेठेत उपलब्ध होतात. त्यामुळे येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात द्राक्षाची गोडी चाखायला मिळणार आहे.
मायणी परिसरामध्ये द्राक्ष भागांसाठी पोषक वातावरण, खडकाळ व मुरमाड जमीन, पाण्याची उपलब्धता कमी असतानाही द्राक्ष उत्पादन घेता येऊ शकते, हे लक्षात आल्यामुळे गेल्या दशकापासून या परिसरामध्ये हजारो एकर क्षेत्रावर द्राक्षबागा उभ्या राहिल्या. द्राक्ष लागवडीपासून साधारण तिसऱ्या वर्षांपासून द्राक्षबागा धरण्यास सुरुवात करतात. लाखो रुपये खर्च करून पोटच्या मुलाप्रमाणे या बागांचा संभाळ शेतकरी करत आहेत. हवामानाने साथ व चांगला दर मिळाला, तर लागवडीचा खर्च साधारण एक ते दोन वर्षांच्या आत पूर्ण निघत असल्याने निर्यात द्राक्ष घेण्याकडे या भागाचा कल वाढला आहे.
साधारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच या हंगामाला सुरुवात होते. झाडांची पान चटणी, कांडी छाटणी केल्यानंतर साधारण १२० दिवसांमध्ये द्राक्ष परिपक्व होऊन बाजारपेठेमध्ये येत असतात. यावर्षीही बागा छाटणीचा हंगाम सुरू झाला असून, हवामानाने चांगली साथ दिली, तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारपेठेत द्राक्ष उपलब्ध होण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या सुरुवातीलाच खवय्यांना द्राक्षाची गोडी चाखायला मिळणार आहे.
कोट...
पावसाने थोडी उघडीप दिली की द्राक्षबागा छाटणीस सुरुवात केली जाते. पाने छाटल्यानंतर अनावश्यक वाढलेल्या कांद्या (फांद्या) छाटल्या जातात व नवीन हंगाम धरण्यास सुरुवात केली जाते. साधारण १२० दिवसांत द्राक्ष पूर्ण परिपक्व होऊन बाजारपेठेत उपलब्ध होतात.
- दीपक यलमर, द्राक्ष बागायतदार, कान्हरवाडी
२२मायणी
मायणी परिसरातील कान्हरवाडी या ठिकाणी द्राक्षाची पाने छाटणीस सुरुवात झाली आहे.