दुभाजकात गवत, झुडुपांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:22+5:302021-06-25T04:27:22+5:30
कऱ्हाड : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या रुंदीकरणामुळे रस्त्याचा कायापालट झाला आहे. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी दुभाजकाची निर्मिती करण्यात आली. ...
कऱ्हाड : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या रुंदीकरणामुळे रस्त्याचा कायापालट झाला आहे. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी दुभाजकाची निर्मिती करण्यात आली. मात्र, सध्या दुभाजकांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. दुभाजकातील झाडे वाळली आहेत. तर पावसामुळे गवत वाढले आहे. मोठ्या प्रमाणावर झुडुपांचेही साम्राज्य निर्माण झाले असून रिफ्लेक्टरची मोडतोड झाल्यामुळे दुभाजक भकास बनला आहे.
पात्रता परीक्षेमध्ये प्रकाश नांगरे यांचे यश
कऱ्हाड : पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्यावतीने सहायक प्राध्यापक पदासाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत प्रकाश श्यामराव नांगरे यांनी यश मिळविले. इतिहास विषयातून ते उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी राज्यभरातून परीक्षार्थी सहभागी झाले होते. त्यामधून प्रकाश नांगरे यांनी यश मिळविले.
कऱ्हाड तालुक्यात पावसाची उघडीप
कऱ्हाड : शहरासह तालुक्यात आठवडाभर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. मात्र, गत चार दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. त्यामुळे खरीपपूर्व मशागतीच्या कामांना शिवारात वेग आला आहे. नांगरट, सरी सोडणे तसेच शेतातील कचरा गोळा करण्यात सध्या शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. आणखी काही दिवस पावसाने उघडीप दिल्यास शेतकऱ्यांची पेरणीपूर्व कामे पूर्ण होतील.
श्यामगावच्या घाटात फांद्या विस्तारल्या
श्यामगाव : श्यामगाव येथील घाट रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहेत. मार्गानजीक झुडुपे वाढल्याने त्याचा तेथून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना अडथळा होत आहे. मसूर फाटा ते रायगाव फाटा या घाट मार्गानजीक झुडपे वाढल्याने समोरून येणारे वाहन दृष्टीस पडत नाही. परिणामी, अपघातास निमंत्रण मिळत आहे. संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांकडून वेळीच लक्ष देऊन झुडुपांच्या फांद्या तोडण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांतून मागणी होत आहे.