एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांना शेजाऱ्यांचा मोठा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:40 AM2021-07-27T04:40:25+5:302021-07-27T04:40:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : महानगरांमध्ये शिक्षण घेऊन आलेल्या सातारकरांनी औद्योगिक वसाहतीत मर्यादित नोकरीच्या संधी असल्याने नोकरीसाठी पुन्हा महानगर ...

Great support for neighbors living alone! | एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांना शेजाऱ्यांचा मोठा आधार!

एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांना शेजाऱ्यांचा मोठा आधार!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : महानगरांमध्ये शिक्षण घेऊन आलेल्या सातारकरांनी औद्योगिक वसाहतीत मर्यादित नोकरीच्या संधी असल्याने नोकरीसाठी पुन्हा महानगर गाठले. या तरुणांच्या पश्चात असणाऱ्या ज्येष्ठांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शेजाऱ्यांनी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सणसमारंभांसह परस्परांकडे जेवणाचे आदान-प्रदान करून विस्तीर्ण कुटुंब पद्धतीचा अनुभव ज्येष्ठ घेत आहेत. पण, कायदेशीरदृष्ट्या पोलिसांकडे याची नोंदच नाही.

शहर व परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. ज्येष्ठांना विरंगुळ्यासाठी व एकत्रित समूहाचा अनुभव यासाठी विविध उपनगरांमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ अस्तित्वात आले आहेत. मात्र, कोरोना आल्यापासून मागील दोन वर्षे लोटली तरीही ज्येष्ठांना त्यांच्या मित्र-मैत्रिणींना भेटता आले नाही. परस्परांशी संपर्कात नसलेल्या ज्येष्ठांना कोविडकाळात संकटांना सामोरे जाण्याची वेळ आली नाही. बहुतांश जणांना त्यांच्या शेजाऱ्यांनी आधार देत सण-समारंभांसह त्यांना काय हवं-नको ते लक्षपूर्वक पाहिलं. ज्येष्ठांना मानसिक आधार देण्याबरोबरचं त्यांच्या औषधांसाठीही शेजाऱ्यांनी मदत केल्याचे सुखावह चित्र साताऱ्यात पाहायला मिळाले.

चौकट :

सोशल पोलिसिंगला मनुष्यबळाचा अडसर!

वृद्धांची हेळसांड होऊ नये, तसेच त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांकडे वृद्धांची स्वतंत्र नोंद आवश्यक आहे. याबरोबरच त्यांना काही त्रास होतोय का, याच्या चौकशीसाठीही पोलिसांनी त्यांच्याकडे जाणं अपेक्षित आहे. पण वाढत्या गुन्हेगारीपुढे अपुऱ्या ठरलेल्या मनुष्यबळामुळे ‘सोशल पोलिसिंग’ करण्याला सवडच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी, त्याला प्रतिबंध बसविण्यासाठी शासनाने कितीही उत्तम योजना आणल्या तरी मनुष्यबळाच्या अभावी त्याला मूर्त स्वरूप द्यायला अडचण येत आहे.

भेटीवर मर्यादा; पण ऑनलाइन जोमात

कोविडकाळात एकत्र येण्यावरच निर्बंध आल्याने ज्येष्ठांच्या भेटीगाठी, गप्पा-टप्पा देखील कमी झाल्या आहेत. ज्येष्ठांसाठी परिसरातील विविध समाज मंदिरांमध्ये होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक कार्यक्रमांनाही ‘ब्रेक’ लागला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरातच एकप्रकारे बंद होण्याची वेळ ओढवल्याने अनेक जण त्रस्त झाले. पण प्रत्यक्ष भेटणं शक्य नसलं तरीही ऑनलाइन धम्माल करण्यात ते कुठंच मागे राहिले नाहीत.

पॉइंटर :

जिल्ह्यातील पोलीस ठाणे : २९

पोलीस अधिकारी :

पोलीस कर्मचारी : २६५९

ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या :

कोट :

आयुष्यात एकदाही पोलिसांकडून विचारणा नाही!

उच्च शिक्षण आणि त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने मुलगा मोठ्या शहरांमध्येच वास्तव्याला आहे. या शहरांशी जुळवून घेणं आम्हाला शक्य नसल्याने मी आणि माझी पत्नी साताऱ्यातच राहतो. गेल्या चार दशकांत इथले शेजारी आमचे कुटुंबीय झालेत, त्यामुळे काही लागलं तर आम्ही त्यांची मदत घेतो.

- धारेश्वर शेटे, विलासपूर

कोविडकाळात कोणत्याही कारणांनी घराबाहेर पडायची वेळ आली नाही. आमच्या परिसरातील तरुणांनी भाजीपासून अगदी बिलं भरण्यापर्यंत सगळी कामं स्वत: चौकशी करून केली. केलेल्या कामाचा मोबदला दिला तर ‘आजी राहू द्या, तुमची नातवंडं असती तर केलीच असती की, ती इथं नाहीत तोवर तुम्ही आमची जबाबदारी..’ असं म्हणून त्यांनी सगळं केलं.

-

Web Title: Great support for neighbors living alone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.