खासगीत कोविड टेस्टला भले मोठे वेटिंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:39 AM2021-04-10T04:39:03+5:302021-04-10T04:39:03+5:30
प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सरकारी यंत्रणांवर कोविड लसीकरणाचा ताण असल्याने कोविड तपासणी करण्याची जबाबदारी आता खासगी ...
प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सरकारी यंत्रणांवर कोविड लसीकरणाचा ताण असल्याने कोविड तपासणी करण्याची जबाबदारी आता खासगी यंत्रणांवर सोपविण्यात आली आहे. सध्या सर्वत्रच कोविड तपासणीसाठी लगबग सुरू असल्याने कारखाने, खासगी कार्यालये यांसह सक्तीने कोविड तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आस्थापनांची भली मोठी यादी या लॅबमध्ये येऊन धडकत आहे. परिणामी खासगीत कोविड टेस्ट करण्यासाठी आता भले मोठे वेटिंग करण्याची वेळ आली आहे.
आरोग्य यंत्रणेवर कोविड लसीकरणाचा ताण वाढला असल्याचे सांगत यापुढे कोविड तपासणी खासगी ठिकाणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. खासगीत तपासणी करण्यासाठी आवश्यक किट शासन उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे खासगीत तपासणीचे दरही शासनाच्या नियंत्रणात असतील असा निर्वाळा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. खासगी ठिकाणी कमी दरांमध्ये या चाचणी करून मिळणार असल्या तरीही त्याचा आर्थिक ताण कामगार किंवा व्यवस्थापनावर पडणार आहे. मंदीच्या काळातून चाललेल्या उद्योगधंद्यांची चाकं आत्ताशी कुठं गती घेत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा सगळं अनिश्चिततेच्या गर्तेत आणून ठेवलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये उत्पादन, पुरवठा, विपणन या पातळीवरील काम हळूहळू मार्गावर येऊ पाहत असतानाच दुसऱ्या लाटेने आणलेले निर्बंध अधिक काळ राहिले तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती होण्याचा धोका जाणकार व्यक्त करता.
चौकट :
खाजगीत सवलतीचे दर यायलाही अवकाश
कोविड लसीकरणाचा ताण सरकारी यंत्रणांवर चांगलाच पडू लागला आहे. याचा ताण कमी करण्यासाठी रॅट आणि आरटीपीसीआर या तपासण्या सरकारी रुग्णालयांत होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. औद्योगिक वसाहतीतील कामगारांना दर पंधरा दिवसांनी कोविड चाचणी प्रमाणपत्र व्यवस्थापनाला दाखवणं बंधनकारक आहे. यापूर्वी या तपासण्या जिल्हा रुग्णालयासह सरकारी रुग्णालयात मोफत करण्यात येत होत्या. खासगीत तपासणी करताना शासन त्यांना किट उपलब्ध करून देणार असून त्यानंतर रॅट तपासणी दीडशे रुपयांत, तर आरटीपीसीआर तपासणी ३०० ते ५०० रुपयांची करणार आहेत. मात्र, खासगीत सरकारी किट उपलब्ध होईपर्यंत या तपासण्या ७०० आणि १२०० रुपयांनीच करण्यात येतील. हा भुर्दंड सर्वसामान्यांच्या डोक्यावर मारला जाऊ शकतो.
हा असू शकतो पर्याय
कोविड लसींचा सध्या सर्वत्रच तुटवडा आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत लस उपलब्ध होईपर्यंत जिल्हा आरोग्य प्रशासनाने कोविड तपासणीची शिबिरे घेतली, तर खासगी व्यवस्थापनांवर येणारा ताण कमी होईल. जोवर कोविड लस उपलब्ध होत नाही तोवर रुग्णांना रांगेत उभे करण्यापेक्षा किंवा त्यांची तपासणीच लांबविण्यापेक्षा तपासण्या सुरू करण्यात याव्यात. कोविड लस आली की शासकीय यंत्रणा लसीत व्यस्त राहतील तोवर यंत्रणा बसविण्याची तयारी खासगीत करता येईल.
कोट
औद्योगिक वसाहतीच्या कामगारांची कोविड तपासणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कामगारांसह प्रत्येकाची सुरक्षितता महत्त्वाची आहे. स्वत:सह कामगार आणि उद्योग व्यवसाय टिकवणं हेच कोविडने शिकवले आहे. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारून आम्ही त्यांचे लसीकरण करणार आहोत. यासाठी खासगी लॅबचे आवश्यक ते सहकार्य घेण्यासाठी पत्रव्यवहारही केला आहे.
-वसंतराव फडतरे, कवित्सु ट्रान्समिशन, सातारा