कर्नाटक सीमाभागात तीव्र पाणीटंचाई
By admin | Published: February 21, 2016 11:57 PM2016-02-21T23:57:57+5:302016-02-21T23:57:57+5:30
कृष्णा नदीपात्र कोरडे : कारखान्यांना पाणी वापरास प्रतिबंधाची नोटीस
मिरज : कृष्णा नदीपात्र कोरडे पडल्याने कर्नाटकात सीमाभागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चिकोडी व अथणी तालुक्यातील साखर कारखान्यांना पिण्याच्या पाण्याचे साठे वापरास प्रशासनाने प्रतिबंधाची नोटीस बजावली असून पाण्याअभावी नदीकाठावरील गावांतील पाणी योजना बंद पडल्या आहेत. चिकोडी व अथणी तालुक्यातील सुमारे १०० गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
शिरोळ तालुक्यातील कर्नाटक सीमेवर कृष्णा नदीवर असलेल्या राजापूर, बंधाऱ्यात अपुरा पाणीसाठा असून कर्नाटक हद्दीत कृष्णा नदीपात्र कोरडे आहे. उगार व कुडची येथे नदीपात्रात पाण्याचा खडखडाट असून नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या कुडची, उगार, जुगूळ, शिरगुप्पी, ऐनापुर, कृष्णाकित्तूर यासह अनेक गावात नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. या गावात विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याचा वापर सुरू आहे. कृष्णानदीवर जमखंडीजवळ सहा टीएमसी क्षमतेच्या हिप्परगी धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे जमखंडी व बागलकोट परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी टंचाईमुळे केंपवाड, अथणी, कोकटनूर, हल्याळ, उगार येथील पाच साखर कारखान्यांना पिण्याच्या पाण्याचे साठे वापरण्यास प्रतिबंधाची नोटीस बजावली आहे. पाण्याअभावी साखर कारखान्यांचे गाळप किती दिवस सुरू राहणार, याबाबत अनिश्चितता आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावत असून टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी होत आहे. पुढील दोन आठवड्यानंतर चिकोडी व अथणी तालुक्यातील सुमारे शंभर गावात टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे.