लोकरी माव्यामुळे उसावर संकट

By Admin | Published: December 3, 2015 09:50 PM2015-12-03T21:50:45+5:302015-12-03T23:48:23+5:30

कोपर्डे हवेली : संकट घालविण्यासाठी औषधांची फवारणी; शेतकरी हवालदिल

Greedy crisis due to wool litter | लोकरी माव्यामुळे उसावर संकट

लोकरी माव्यामुळे उसावर संकट

googlenewsNext

 कोपर्डे हवेली : साखरेचे उतरलेले भाव आणि साखर कारखान्यांकडून केली जाणारी पाण्याची टंचाई आदी कारणाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता हातातोंडाशी आलेल्या उसाच्या पिकावर लोकरी माव्याचे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर आलेले संकट घालविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध रासायनिक औषधांच्या फवारण्या केल्या जात आहे.इतर पिकांच्या तुलनेत हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी उसाची लागवड करतात. पण गेल्या दोन वर्षांपासून उसाचे अतिरिक्त उत्पादन झाले असल्याने साखरेचे बाजार पेठेतील दर ढासळले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांकडूनही शेतकऱ्यांना उसाचे बिल देता आलेले नाही. केंद्र आणि राज्य शासनाकडून कारखाने मदत मागत आहेत.
ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांकडून अनेकवेळा राज्यामध्ये आंदोलने झाली आहेत. एकीकडे बऱ्याच कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे उसास दर दिलेला नाही. अशा परिस्थितीत दुसरीकडे ऊस उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने ऊस शेती तोट्यात येत आहे. याबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये कधी अवकाळीपाऊस तर कधी दुष्काळ, प्रतिकूल हवामान आदी कारणाने उसाच्या वजनावर त्याचा परिणाम होत आहे.
गतवर्षामध्ये जून ते आॅगस्ट या महिन्यांमध्ये झालेल्या आडसाली लागणीच्या उसावर लोकरी माव्याचा प्रादूर्भाव झाला आहे. लोकरी माव्याच्या प्रादुर्भावास सुरुवात झाली असल्याने तो लवकर अटोक्यात आणण्यासाठी शेतकरी रासायनिक औषधांच्या फवारण्या घेत आहेत. लोकरी माव्याच्या प्रादुर्भावामुळे उसाचे वजन घटत असते. शिवाय त्याची वाढ पूर्ण क्षमतेने होत नाही. उसाच्या पानातील रस किडे शोषून घेतात. पाने पांढरी होऊन काळपट होतात. ढगाळ वातावरणामध्ये लोकरी माव्याचा प्रादूर्भाव लवकर होताना दिसून येतो. तर पावसामुळे हा मावा धुतला जातो. उसावर लोकरी माव्याचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन घटून शेतीचे नुकसान होत आहे. (वार्ताहर)

पाऊस कमी अन् लोकरी माव्याचे संकट
यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे उसाचे टनेज गत वर्षाच्या तुलनेत भरत नाही. शिवाय भविष्यात पाणी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. त्यामध्ये लोकरी माव्याचे संकट आदी कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

ऊस उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या तुलनेत उसाला दर मिळत नाही. अशा परिस्थितीत उसावर आलेले लोकरी माव्याचे संकट म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असे आहे.
- अरुण चव्हाण,
ऊस उत्पादक शेतकरी, कोपर्डे हवेली

Web Title: Greedy crisis due to wool litter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.