ग्रीन टाकेवाडीसाठी आता ‘घरेही हिरवी’..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:52 PM2018-07-03T23:52:36+5:302018-07-03T23:52:40+5:30
नितीन काळेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : दुष्काळी माणदेशातील टाकेवाडी गावाने वॉटर कप स्पर्धेतील जलसंधारणाच्या कामानंतर गाव हिरवागार करण्याचा निर्धार केला आहे. त्यातूनच घरांना हिरवा रंग देण्याचे काम सुरू आहे. तसेच गावातील रस्ते, परिसर, डोंगरात पाच हजारांहून अधिक झाडे लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर गावातील एका व्यक्तीस दोन झाडे देण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच दुष्काळी टाकेवाडी ‘ग्रीन माण’साठी एक आदर्श ठरणार आहे.
माण तालुक्यातील टाकेवाडी. तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडीपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर. तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेलं हे गाव तसं दुर्गम. गावातील बहुतांशी कुटुंबाचा व्यवसाय हा मेंढपाळचा. तर अनेक घरातील तरुण नोकरीनिमित्त पुण्या, मुंबईला. या गावात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवायचं. त्यामुळे ग्रामस्थांनी ठरविले आता पाण्याबाबत स्वयंपूर्ण व्हायचं. टाकेवाडी गावाने यावर्षीच वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आणि गाव बदललं. आता गाव हिरवागार करण्याचा निर्धार केला आहे.
टाकेवाडीने आता गाव हिरवागार करण्याचा पूर्ण निश्चय केला आहे. त्यासाठी चार हजार झाडांची नर्सरी तयार केली आहे. तर दोन हजार झाडे लावण्यात आली असून, आणखी चार हजार झाडे लावण्यात येणार आहेत. ही झाडे प्रथम गावातील रस्त्याच्या बाजूने व बोळातून लावण्यात येणार आहेत. त्यानंतर परिसरातील मोकळ्या जागेवर ही झाडे लावली जाणार आहेत. विशेष म्हणजे या गावातील प्रत्येक व्यक्तीस दोन झाडे देण्यात येणार आहेत. त्या व्यक्तीने हे झाड लावून जगवायचं आहे. झाडांची काळजी घेऊन वेळच्यावेळी पाणी देणे, संरक्षण करायचे आहे.
लोकवर्गणीतून काम सुरू...
या गावाचे आणखी एक वैशिष्ट ठरले आहे ते म्हणजे गाव हिरवागार करण्याबरोबरच घरेही हिरवीगार करण्यात येत आहेत. सर्वच घरांना हिरवा रंग देण्याचे काम सुरू झाले आहे. लोकवर्गणीतून घरांना रंग देण्यात येत आहे. त्यामुळे गावात एक प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे. कोणाच्याही मदतीशिवाय हे काम सुरू आहे. गावाचे हे पाऊल इतरांसाठी एक आदर्श ठरणार आहे.
चिंच, आंबा, जांभूळ, करंज झाडे लावणार
सीसीटीत जंगली झाडांच्या बिया टाकणार