जिल्ह्यातील १३९४ संस्थांच्या निवडणुकीला हिरवा कंदील !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:43 AM2021-01-13T05:43:44+5:302021-01-13T05:43:44+5:30
सातारा : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. आता सातारा ...
सातारा : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. आता सातारा जिल्ह्यातील १ हजार ३९४ सहकारी संस्थांच्या निवडणुका टप्प्या-टप्प्याने घेतल्या जाणार असून, पुढील आठवड्यात काही संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
राज्यातील सात जिल्हा बँका, साखरे कारखाने व इतर सहकारी संस्था अशा ३८ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकार विभागाला दिले होते. सातारा जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक, कृष्णा सहकारी साखर कारखाना या मोठ्या संस्थांसह इतर सहकारी बँका, पतसंस्था, विकास सेवा सोसायट्यांचे निवडणूक आता घेता येणार आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची मुदत मार्च २०२०मध्ये संपली. त्यानंतर सहकार विभागाने निवडणुकीसाठी सोसायट्यांचे ठराव मागविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र २६ मार्च रोजी कोरोनाचे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. तसेच ठराव प्रक्रियाही रद्द करण्यात आली. सप्टेंबर २०२० पर्यंत निवडणुकीला मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा डिसेंबर २०२० पर्यंत ती वाढविण्यात आली. येत्या मार्च महिन्यात निवडणुका घेण्यात याव्यात, असा मतप्रवाह सत्ताधाऱ्यांमधूनच होता. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुका घ्यायला हिरवा कंदील दाखवला आहे.
दरम्यान, एका वेळी १ हजार ३९४ सहकारी संस्थांच्या निवडणुका एकदम घेणे शक्य नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक व कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या सहकारी संस्था
अ वर्ग ६
ब वर्ग ५८३
क वर्ग ४९७
ड वर्ग ३0८
जिल्ह्यातील एकूण सहकारी संस्था
जिल्ह्यातील सहकारी संस्था १३३८
विकास सेवा सोसायट्या ९००
सहकारी बँका ३२
सहकारी पतसंस्था ११००