पोपटवाडी अंतर्गत रस्त्यासाठी गृहराज्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:05+5:302021-06-25T04:27:05+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील मेढा नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या पोपटवाडी (पोलीस वसाहत)नजीक असणाऱ्या रहिवाशांच्या रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक ...
कुडाळ : जावळी तालुक्यातील मेढा नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या पोपटवाडी (पोलीस वसाहत)नजीक असणाऱ्या रहिवाशांच्या रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. येथील नागरिकांची रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद व नियोजन मंडळाचे सदस्य दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली वेण्णामाईचे अध्यक्ष सुरेश पार्टे, मेढ्याचे माजी सरपंच नारायणराव शिंगटे, माजी उपसरपंच प्रकाश कदम, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अंकुश सावंत, अशोक साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते अमजत पठाण यांच्या शिष्टमंडळाने शंभूराज देसाई यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पोपटवाडी नागरिकांची व्यथा त्यांच्यासमोर मांडून या पोलीस वसाहत अंतर्गत रस्त्याच्या अडचणीबाबतचे निवेदनही त्यांना दिले.
पोपटवाडी येथील ग्रामस्थांचा रस्ता हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात आहे. गेल्या ५० वर्षांपूर्वी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी सातारा-मेढा-महाबळेश्वर रोडलगत असणारी जमीन पोलीस वसाहत व पोलीस ठाण्यासाठी दिली होती. मात्र, त्यांनाच गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी याचना करावी लागत आहे. हा रस्ता झाल्यास त्याचा फायदा नजीकच्या रहिवासी नागरिकांबरोबरच पोलीस वसाहत व पोलीस स्टेशन येथे कामानिमित्त येणाऱ्या सर्वच नागरिकांनाही होणार आहे.
(चौकट)
अधीक्षकांना अहवाल सादर करण्याच्या सूचना..
पोपटवाडी (पोलीस वसाहत) अंतर्गत रस्त्याच्या प्रश्नाची सविस्तर माहिती घेतल्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने पोलीस अधीक्षक यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत संबंधित नागरिकांच्या रस्त्याची अडचण सोडविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.