तब्बल चार हजार झाडे लावणारी ‘हरित शाळा’
By Admin | Published: June 30, 2016 11:02 PM2016-06-30T23:02:15+5:302016-06-30T23:10:26+5:30
श्रीपतराव पाटील विद्यालय : संगीत, नाट्य, क्रीडा क्षेत्रात उमटविला ठसा; ज्ञानरचनावादातून आनंददायी शिक्षण-- अशी ही जगावेगळी शाळा
प्रदीप यादव --सातारा : बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतांना चालना देणारे शिक्षण मिळणे तसेच केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. सुजाण नागरिक घडविण्याचे काम करंजे पेठ येथील श्रीपतराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात होत आहे. याबरोबरच सलग पाच वर्षे दरवर्षी आठशे झाडे लावण्याचा निर्धार करणारी ही आधुनिक ‘हरित शाळा’ ठरली आहे. शुक्रवार, दि. १ रोजी करंजे परिसरात आठशे रोपांची लागण करण्यात येणार आहे.
सातारा शहरालगतच्या करंजे या छोटेखानी गावात १९६९ मध्ये संस्थापक सचिव दिवंगत साहेबराव पाटील, दिवंगत संस्थापक अध्यक्ष नारायराव पवार आणि दिवंगत विठ्ठल किर्दत गुरुजी या त्रयींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती शिक्षण प्रसारक संस्थेची उभारणी करून श्रीपतराव पाटील विद्यालयाची स्थापना केली. केवळ ३० विद्यार्थ्यांसह ४५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शाळेत आज १३०० विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत.
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या कला, कौशल्य व सुप्त गुणांना हेरून त्यांना चालना देण्याचे काम शिक्षक करत आहेत. गाईडमध्ये सातवी व दहावीच्या मुलींनी यावर्षी राज्य पुरसकार पटकावला
आहे.
केवळ शैक्षणिकच नव्हे तर कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही शाळेने आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
शाळेत विद्यार्थ्यांचा गीतमंच, वाद्यवृंद व बॅण्डपथक आहे. शहरातील विविध कार्यक्रमांमध्ये मुलांनी आपली कला सादर करून वाहवा मिळविली आहे. थायलंड येथील आंतरराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन टीमने शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट प्रात्यक्षिकांबद्दल त्यांचे कौतुक केले.
रोप लावून वाढविणार...
करंजे भाग प्रदूषणमुक्त होण्यासाठी स्वच्छ करंजे, हरित करंजे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पुढील पाच वर्षे हा उपक्रम राबविण्यात येणार असून यंदा आठशे रोपे लावली जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक रोप लावले जाणार आहे. तसेच ते झाड पूर्ण वाढेपर्यंत तो विद्यार्थी व त्याचे कुटुंब, शिक्षक त्या झाडाची काळजी घेणार आहेत.
बायो-डिझेल प्रकल्प राज्यात प्रथम
श्रीपतराव पाटील विद्यालयाच्या बायो-डिझेल प्रकल्पाला राज्यस्तरीय प्रदर्शनात प्रथम क्रमांक तर बिहार-पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळाला आहे. ओडिसा-भुवनेश्वर येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाली.
कला महोत्सवाचे आयोजन
शाळेत दरवर्षी कला महोत्सवाचे आयोजन केले जाते. ग्रंथमहोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमात दरवर्षी शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सलग चार वर्षांपासून २६ जानेवारीला शाहू स्टेडियमवर शाळेच्या ७०० विद्यार्थ्यांचा अनोखा सांस्कृतिक कार्यक्रम होतो. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कला उत्सवात विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचा डंका वाजविला.