छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:36 AM2021-04-13T04:36:45+5:302021-04-13T04:36:45+5:30
सातारा : छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्मरण दिनानिमित्त महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र वढू बुद्रूक येथे ...
सातारा : छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्मरण दिनानिमित्त महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र वढू बुद्रूक येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी पहाटे समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
बलिदान स्मरण दिनाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शंभूभक्त समाधीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी येत असतात. या ठिकाणी दरवर्षी राज्याच्या विविध भागांतून शंभूज्योत आणत असतात. यावर्षी कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी पुण्यतिथीचे कार्यक्रम स्थानिक पातळीवर करण्यात आले.
आज पहाटे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर नित्यनियमाने होणारी पूजा ग्रामस्थांनी केली. महाराजांच्या समाधीवर जलाभिषेक करून अभिवादनाला सुरुवात झाली. त्यानंतर उदयनराजे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. प्रथेप्रमाणे उपस्थित ग्रामस्थांनी महाराजांची प्रार्थना करून अभिवादन केले. त्यानंतर उदयनराजे यांनी कवी कलश यांच्या समाधीवर फुले वाहून दर्शन घेऊन महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
त्यानंतर उदयनराजे यांच्या हस्ते समाधीपरिसरात रक्तचंदन आणि अजानवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी वनस्पती शास्त्रज्ञ डॅा. सचिन पुणेकर यांनी या वृक्षाचे महत्त्व सांगितले. त्याचबरोबर या वृक्षारोपणासाठी विविध नद्यांतून पाणी आणल्याचे मिलिंद गायकवाड यांनी सांगितले. अभिवादनासाठी वढू बुद्रूकचे सर्व ग्रामस्थ, शंभूभक्त उपस्थित होते.
फोटो ओळ : वढू बुद्रूक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला सोमवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिवादन केले.