ऐतिहासिक भूमीचा माउलींना निरोप
By Admin | Published: July 10, 2016 01:34 AM2016-07-10T01:34:07+5:302016-07-10T01:49:40+5:30
पालखी सोहळा : जिल्ह्यातील पाहुणचार घेऊन वारकरी भारावले; माउली संतांच्या जिल्ह्यात
सातारा : ऐतिहासिक सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा शनिवारी संतांची भूमी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात गेला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात मंगळवारी (दि. ५) आगमन झाले होते. सातारा जिल्ह्यातील लोणंद, तरडगाव, फलटण येथील मुक्काम आटोपून शेवटच्या मुक्कामासाठी शुक्रवारी बरडला वैष्णवांचा मेळा विसावला होता. या मार्गात वारीतील पहिले उभे रिंगण तरडगावला बुधवारी झाले.
जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम बरड येथे आटोपून शनिवारी सकाळी विधिवत पूजा करण्यात आली. सकाळी साडेसहाला सोहळ्याने बरड येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.
मार्गात राजुरी येथील साधुबुवा मंदिरामधील विसाव्यानंतर तेथे न्याहरी केली. तेथे सरपंच कौशल्या साळुंखे, उपसरपंच भरत गावडे, माजी सभापती स्मिता सांगळे, धनंजय पवार, डॉ. बाळासाहेब सांगळे, ग्रामविकास अधिकारी मोहन सुतार यांनी स्वागत केले.
राजुरी येथे जिल्ह्याच्यावतीने निरोप व सोलापूर जिल्ह्याच्यावतीने स्वागताचा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, पाणीपुरवठा विभागाचे सोनावणे उपस्थित होते. (वार्ताहर)
प्रशासनाचे आभार
चार दिवसांच्या मुक्कामात वारकऱ्यांना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घेतली होती. तसेच मार्गातील प्रत्येक गावामध्ये उत्स्फूर्त स्वागत केले. याचे वारकऱ्यांनी स्वागत केले.