जुगाडातून बनवलेले धान्य मळणी मशीन फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:29 AM2021-05-30T04:29:58+5:302021-05-30T04:29:58+5:30
काय आहे जुगाड... पूर्वीच्या काळी धान्य मळणी बैलांच्या सहाय्याने केली जात होती. त्यासाठी खळे केले जायचे, मध्ये एक लाकूड ...
काय आहे जुगाड...
पूर्वीच्या काळी धान्य मळणी बैलांच्या सहाय्याने केली जात होती. त्यासाठी खळे केले जायचे, मध्ये एक लाकूड उभे करण्यात येत असे. या लाकडाच्या भोवतीने बैल गोल फिरत. त्यामुळे खाली टाकलेली कणसे तुडवली जाऊन धान्य निघत असे. यानंतर धान्य मळणी मशीन आली.
धान्य गाळप करण्याच्या मशीनची ने-आण करण्यासाठी बैलजोडी लागायची. मात्र, बैलजोड्या काळानुरूप कमी होत चालल्या आहेत. त्यामुळे बैलगाडी अन् बैलजोडी मागे पडली. आता बैलजोडीच्या मळणीला मशीन अन् जुगाड हा पर्याय आला. काही शेतकरी व कारागिरांच्या सुपीक डोक्यातून या जुगाडाची निर्मिती झाली.
वापरात नसलेल्या आणि कालबाह्य झालेल्या, भंगारात निघालेल्या जुन्या जीपच्या फक्त चेसीजचा वापर यासाठी करण्यात येतो. वाहनाच्या सांगाड्यावर मळणी यंत्र बसविण्यात येते तर वाहतुकीला व मळणी यंत्राला एकच असे चालणारे इंजिन ॲडजस्ट करण्यात येते. यामुळे याचा दुहेरी फायदा होत आहे.
मळणी यंत्र चालवणे...
वाहतुकीसाठी चालक आणि मालक अशी भूमिका बजावण्याचे काम हा शेतकरीच करत असतो. त्यामुळे वेगवेगळे मनुष्यबळ लागत नाही. रब्बी व खरीप हंगामात काही दिवस या जुगाडाच्या सहाय्याने धान्य मळणी करण्यात येते. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे हे जुगाड यंत्र नेण्यात येते. यामधून मशीनधारक शेतकऱ्याला धान्य पोत्यामागे ठरलेल्या प्रमाणात दिले जाते. यातून शेतकऱ्याचे काम लवकर होते. त्याचबरोबर मशीन मालकालाही फायदा होतो. काही दिवसच धान्य मळणी चालते.
धान्य गाळपाचे काम संपले की काहीजण हे मशीन उतरून याच जुगाडावर एक हौदा बसवतात. बैलगाडी वाहतुकीला पर्याय म्हणून याचा वापर करतात. त्या हौदात पाण्याची टाकी टाकून पाणी वाहतूक करणे सोईस्कर होते तर शेतात खत नेणे, धान्य, कडबा वाहतूक करणे यासाठी हे सवडीनुसार वापरले जाते. या जुगाडला १० अश्वशक्तीपर्यंतचे इंजिन जोडलेले असते. डिझेल टाकायला परवडते म्हणून हे जुगाड किफायतशीर ठरत आहे.
कोट :
मळणी मशीनने धान्य करण्यासाठी पूर्वी बैलजोडी लागत होती. मात्र, या कामासाठी दोन बैल पाळणे खर्चिक आणि जोखमीचे झाले आहे. त्यामुळे आता आलेली जुगाडाची कल्पना चांगली आहे. सगळी कामे यावरच होत आहेत. तसेच या जुगाडाचे अनेक फायदेही आहेत. यामुळे अनेक शेतकरी याचा वापर करताना दिसून येत आहेत.
- सोपान हांगे, मळणी मशीनमालक, पळशी, ता. माण
फोटो २९ मळणी मशीन फोटो...
- नितीन काळेल