मैदाने बंद; कुस्ती संकटात; पैलवान हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:21+5:302021-04-10T04:38:21+5:30
प्रमोद सुकरे कराड: कोरोनाच्या महामारी संकटामुळे प्रत्येक क्षेत्राला फटका बसला आहे. त्याला कोणीच अपवाद असेल असे नाही. असाच फटका ...
प्रमोद सुकरे
कराड:
कोरोनाच्या महामारी संकटामुळे प्रत्येक क्षेत्राला फटका बसला आहे. त्याला कोणीच अपवाद असेल असे नाही. असाच फटका कुस्ती क्षेत्रालाही बसलाय. गेली वर्षभर कुस्ती मैदानेच बंद असल्याने पैलवान आर्थिक संकटात सापडले असून ते हतबल झाले आहेत. दररोज लागणारा खुराक त्यांना मिळेना झालाय, एकूणच उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
खरंतर एखादा पैलवान घडवायला दहा ते बारा वर्ष लागतात. आणि एकदा पैलवान तयार झाला की, गावोगावी यात्रांमध्ये, इतर ठिकाणी होणाऱ्या कुस्ती मैदानात तो उतरतो. मैदान मारलं की मिळणाऱ्या बक्षिसावर त्याचा उदरनिर्वाह चालतो. गावोगावच्या जत्रा, यात्रा हेच पैलवानांचे उत्पन्नाचे साधन आहे. त्यातूनच तो त्याच्या खर्चाची तजवीज करतो. पैलवान घडण्यासाठी लोकाश्रयसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो.
मात्र कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे गेल्या वर्षभरापासून कुस्ती मैदानेच झालेली नाहीत. म्हणजे मैदाने आयोजित करायलाच बंदी आहे. परिणामी पैलवान आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र याकडे सध्या कोणाचेच लक्ष दिसत नाही. हे वास्तव आहे.
आज शहरांमध्ये काही मोजक्याच तालमी आहेत.तेथे सराव करणारे पैलवानही मोजकेच राहिले आहेत. मूळताच पैलवान होणे किंवा तयार करणे ही बाब सोपी राहिलेली नाही. महागाईमुळे अगोदरच खुराकाचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे मिळणारी बक्षिसांची रक्कम अन् प्रत्यक्ष येणारा खर्च याचा मेळ कसा घालायचा? हा पैलवानांसमोर प्रश्न आहे. आता तर मैदानेच बंद असल्याने येणेच थांबले आहे.
राज्यामध्ये कुस्ती क्षेत्राचे आकर्षण बऱ्याच तरुणांना आहे. त्यामुळे गोरगरिबांची ,दुष्काळी भागातील शेतकरी, कामगारांची मुले तालमीत सराव करताना दिसतात. पण कुस्ती मैदानेच होत नसल्याने बऱ्याच नवोदित पैलवानांनी आता गावाची वाट धरली आहे. ''सगळी नाटकं करता येतात पण पैशाचं नाटक करता येत नाही'' हे आता त्यांना कळालं आहे. पण एकदा का गावाकडे मुलगा गेला की त्याचा सराव बंद होणार; अन एकदा सरावातून बाहेर पडलेला मुलगा पुन्हा सरावात आणणं खूपच अवघड आणि कठीण होतं. एखाद्या पैलवानाला तयार करताना त्याच्या घरच्यांना, वस्तादांना किती त्याग करावा लागतो याचा अंदाज करता येणार नाही.
खरंच आज कुस्ती क्षेत्रही मोठ्या संकटात आहे. कुस्ती वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी समाजातील दानशूर, लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन कुस्तीला संकटातून बाहेर काढण्याची गरज आहे. लोकाश्रय खूप महत्त्वाचा आहे तो मिळाला तरच कुस्ती वाचणे सोपे होणार आहे.
कोट
कोरोनाच्या संकटामुळे आज कुस्ती आणि पैलवान दोघेही अडचणीत आहेत. कुस्तीला उर्जितावस्था येण्यासाठी आर्थिक पाठबळ आवश्यक आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी ,साखर कारखानदार, दूध संघ चालक, मोठमोठ्या कंपन्या यांनी पैलवानांना खुराकासाठी मानधन देण्याची गरज आहे. कारण कोरोनामुळे गेले वर्षभर कुस्ती मैदाने नाहीत अन कधी सुरू होतील हेही निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे पैलवानांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत.
-पैलवान तानाजी चवरे
कुस्ती संघटक, कराड.
चौकट
कोरोनामुळे यात्रा बंद आहेत. त्यामुळे कुस्ती मैदानेही होत नाहीत. पण कुस्ती शौकीन असणाऱ्या यात्रा कमिटी यांनी जर ठरावीक पैलवानांना बोलावून खुराकासाठी मदत केली तरीदेखील पैलवानांना थोडासा दिलासा मिळेल. त्यासाठी कोणीतरी अशी सुरुवात करण्याची गरज आहे.
फोटो: कुस्तीचा संग्रहीत फोटो वापरावा