निंभोरे, सुरवडी परिसरातील भूजल पातळी टिकून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:54 AM2021-01-02T04:54:35+5:302021-01-02T04:54:35+5:30
फलटण : यावर्षी प्रचंड प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे कधी नव्हे ते वडजल, निंभोरे, सुरवडी परिसरातील भूजल पातळी कमालीची टिकून ...
फलटण : यावर्षी प्रचंड प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे कधी नव्हे ते वडजल, निंभोरे, सुरवडी परिसरातील भूजल पातळी कमालीची टिकून आहे. गेल्या मान्सूनमध्ये झालेला चांगला पाऊस भूजल पातळी स्थिर राखण्यास कारणीभूत आहे. या परिसरातील विहिरींना आजही मुबलक पाणी आहे.
दरवर्षी हे चित्र खूपच विदारक होते. जानेवारीपासूनच भूजल पातळी घटण्यास सुरुवात होते. मार्च, एप्रिल, मेमध्ये तर कूपनलिका कोरड्या पडत असत. भूजल पातळी कमालीची खालावली जाऊन अनेक कूपनलिका बंद पडल्या होत्या. विहिरींनी तळ गाठला होता. नांदलसारख्या गावासाठी टँकरही चालू होते.
यावर्षी मात्र चित्र पूर्णपणे वेगळे आहे. शेतात हिरवीगार पिकं डोलताना दिसत आहेत. गहू, मका, हरभरा पिकांची चांगली उगवण झालेली दिसते. दरवर्षी पिके चांगली येऊन पाणी पातळी कमी झाल्याने पिके सुकून जात. पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच चिंता दिसत असे. यंदा मात्र जमिनीतील पाण्याने शेतकऱ्यांची चिंता मिटवली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच भूजल पातळी जैसे थे आहे. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये काय करायचे, ही चिंता मिटलेली दिसते.
फलटणच्या पश्चिम भागात नेहमीच शेतीच्या पाण्यासाठी ओरड होताना दिसते. नांदल, ढवळेवाडी, सुरवडी, निंभोरे, काशीदवाडी, वडजल या गावांना कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असे; परंतु ज्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते, त्याच पावसाने परिसरातील भूजल पातळी नैसर्गिकपणे टिकून आहे.
चौकट आणि कोट देणार आहे..
फोटो०१फलटण