सातारा जिल्ह्यातील धरण परिसरात जोर'धार', धरणसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:35 PM2018-06-26T13:35:01+5:302018-06-26T13:40:11+5:30
साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून संततधार सुरू असून यामुळे कोयनेसह सर्वच धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयनेत मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ७३१३ क्युसेक पाण्याची आवक झाली असून पाणीपातळी वाढून २६.५५ टीमएसी इतकी झाली आहे. तर पावसामुळे सज्जनगड रस्त्यावर दरड कोसळली.
सातारा : साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून संततधार सुरू असून यामुळे कोयनेसह सर्वच धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयनेत मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ७३१३ क्युसेक पाण्याची आवक झाली असून पाणीपातळी वाढून २६.५५ टीमएसी इतकी झाली आहे. तर पावसामुळे सज्जनगड रस्त्यावर दरड कोसळली.
यावर्षी जिल्ह्यात मान्सूनने वेळेत हजेरी लावली. मात्र, काही दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे सर्वांनाच चिंता लागून राहिली होती. असे असतानाच गेल्या चार दिवसांपासून पाऊस जोर धरु लागला आहे. तर सोमवारपासून पश्चिम भागात संततधार सुरू आहे.
महाबळेश्वर, बामणोली, कास, कोयनानगर, नवजा या भागात पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची मोठी आवक होऊ लागली आहे. कोयनानगर येथे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत १८३ मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात ७३१३ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. तर पाणीपातळी २६.५५ टीमएमसी इतकी झाली आहे.
धोम धरण परिसरात ३२ मिलीमीटर पाऊस होऊन २९४ क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे. कण्हेर येथे ३२, उरमोडी ४५ तर तारळी धरणक्षेत्रात ९९ मिलीमीटर पाऊस झाला.
सध्या धोम, बलकवडी, उरमोडी, तारळीसह प्रमुख धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागात काही ठिकाणी अधूनमधन पाऊस पडला. काही ठिकाणी जोरदार सरीही पडल्या असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
धोकादायक वाहतूक...
सातारा शहराच्या पश्चिमेकडील भागात संततधार सुरू असून त्यामुळे सोमवारी रात्रीच्या सुमारास सज्जनगड रस्त्यावर दरड कोसळली. परिणामी या मार्गावरील अवजड वाहतूक ठप्प झाली होती. तर लहान वाहनांची वाहतूक धोका पत्करुन सुरू होती.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व कंसात एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
धोम ३५ (१२९)
कोयना १८३ (६४४)
बलकवडी ९६ (३१२)
कण्हेर ३२ (९४)
उरमोडी ४५ (१०९)
तारळी ९९ (२४७)