जीएसटी आयुक्त वळवी यांच्या नाशकातही जमिनी; प्रकरण अपर मुख्य सचिवांकडे वर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 08:50 AM2024-07-30T08:50:56+5:302024-07-30T08:51:54+5:30

या प्रकरणाची सुनावणी कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर घ्यायची याचा निर्णय मंत्रालय स्तरावर होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिली.

gst commissioner valvi nashak also lands | जीएसटी आयुक्त वळवी यांच्या नाशकातही जमिनी; प्रकरण अपर मुख्य सचिवांकडे वर्ग 

जीएसटी आयुक्त वळवी यांच्या नाशकातही जमिनी; प्रकरण अपर मुख्य सचिवांकडे वर्ग 

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पीयूष बोंगीरवार यांच्या झाडाणी (ता. महाबळेश्वर) बरोबरच नंदुरबार, नाशिक जिल्ह्यांतही जमिनी असल्याने सातारा अपर जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण राज्य अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्याकडे वर्ग केले आहे. या प्रकरणाची सुनावणी कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर घ्यायची याचा निर्णय मंत्रालय स्तरावर होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिली.

झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६४० एकर जमीन व्यवहारप्रकरणी अपर जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी ११ जुलैला सुनावणी झाली होती. त्यावेळी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, संगीता वळवी, अरमान वळवी आदींनी म्हणणे मांडून कागदपत्रे सादर केली व आणखी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली. अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी २९ जुलैची तारीख देत संबंधित सर्व कागदपत्रे आणि म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार सोमवारी पुन्हा सुनावणी झाली. 

या प्रकरणातील उर्वरित रत्नप्रभा वसावे, अरमान वळवी, संगीता वळवी, दीपाली मुक्कावार यांच्यासह इतर जणांची सुनावणी सातारा अपर जिल्हाधिकारी यांच्यासमोरच होणार आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे त्यांनी सादर केली आहेत.

जास्त जमीन झाडाणीतच

इतर जिल्ह्यात अथवा राज्यात जमीन असेल तर संबंधित विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होते. परंतु, सर्वच झाडाणी, नंदुरबार, नाशिक अशा ठिकाणी त्यांच्या जमिनी आहेत.त्यामुळे राज्य अपर सचिवांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. तथापि, जास्त जमीन झाडाणीतच असल्यामुळे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातच याची सुनावणी होईल, अशी शक्यता आहे.


 

Web Title: gst commissioner valvi nashak also lands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.