‘जीएसटी’ने वाढवला ‘वाणिज्य’चा टक्का! जिल्ह्यातील चित्र : १२०० विद्यार्थी प्रवेशाविना; वाढीव तुकड्यांची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:11 PM2018-07-27T23:11:52+5:302018-07-27T23:12:40+5:30
वाणिज्य शाखेत ‘जीएसटी’मुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता बाजारपेठेत निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला सर्वाधिक पसंती दिली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये अकरावीचे वर्ग १६ जुलैपासून सुरू झाले असले
प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : वाणिज्य शाखेत ‘जीएसटी’मुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता बाजारपेठेत निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला सर्वाधिक पसंती दिली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये अकरावीचे वर्ग १६ जुलैपासून सुरू झाले असले तरीही सुमारे १२०० विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश अद्यापही प्रतीक्षित आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. त्यामुळे महाविद्यालयांना तुकड्या वाढवून घेण्याशिवाय महाविद्यालयांपुढे पर्याय उरलेला नाही.
विज्ञान शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन मर्यादित झालेल्या नोकऱ्यांची संख्या लक्षात घेता विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कल बदलला असल्याचे चित्र यातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच वाणिज्य शाखेत विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविले आहेत. विद्यार्थी प्रवेशाचा कोटा संपल्यामुळे जिल्ह्यातील सातारा, दहिवडी आणि फलटण या तीन ठिकाणच्या सुमारे बाराशे विद्यार्थ्यांचा प्रवेश अद्यापही अडकून पडला आहे. साताºयातील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात १ हजार ७२० अर्ज दाखल झाले होते. यातील ७२० प्रवेश निश्चित केले असून, १ हजार प्रवेश अर्ज कोटा पूर्ण झाल्यामुळे तसेच महाविद्यालयात आहेत.
यातील निम्म्या विद्यार्थ्यांनी अन्यत्र प्रवेश मिळविला तरीही पाचशे विद्यार्थ्यांना प्रवेश देणे गरजेचे ठरणार आहे. दहिवडी महाविद्यालयात ५२६ तर फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात ९० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या तयारीत आहेत. महाविद्यालयांकडून पोहोचलेल्या या प्रस्तावावर उपसंचालकांनी परवानगी दिली तर लगेचच या विद्यार्थ्यांचे प्रवेश तुकडी
वाढवून निश्चित करण्यात येणार आहेत.
वाणिज्य शाखेतील नवीन अभ्यासक्रम
‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर त्याच्याशी निगडीत अन्य काही अभ्यासक्रम वाणिज्य महाविद्यालयात समाविष्ट करून घेण्यात आला आहे. यात प्रामुख्याने ई-कॉमर्स, टॅली, सीपीटी, अॅपलाईड कॉमर्स आणि जीएसटी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आर्थिक सक्षम होण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. महाविद्यालयात हा अभ्यासक्रम शिकविला जात असल्यामुळे
विद्यार्थ्यांना अर्थार्जनाची मोठी संधी उपलब्ध होण्याचे पर्याय खुले आहेत.
अकरावी प्रवेश क्षमता २०१८-२०१९
शाखा अनुदानित, विनाअनुदानित/ स्वयंअर्थ
कायम विनाअनुदानित सहाय्यित
कला १५,४६० ३,३६० २४०
वाणिज्य ७,०८० १,१२० ८८०
विज्ञान ११,२०० ३,८४० २,८६०
संयुक्त ३,००० २४० ४००
एकूण ३६,७४० ८,५६० ४,३८०