कऱ्हाडला पालकमंत्री आले; पण कोणी नाही पाहिले...; दौरा फक्त राहिला जेवणापुरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 11:18 PM2018-06-09T23:18:30+5:302018-06-09T23:18:30+5:30
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे कऱ्हाडकडे नेहमीच दुर्लक्ष राहिल्याचा आरोप होतो
कऱ्हाड : सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे कऱ्हाडकडे नेहमीच दुर्लक्ष राहिल्याचा आरोप होतो. शनिवारी दुपारी मात्र त्यांच्या येण्याची चाहूल कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात अचानक लागली. दुपारी दोनच्या सुमारास ते आले खरे; पण त्यांच्या स्वागताला कोणीही शिवसैनिक दिसत नव्हता. ना कोणाशी त्यांनी काही चर्चा केली. फक्त जेवले आणि शिवतारे बापू निघून गेले. त्यामुळे बापूंचा कऱ्हाड दौरा फक्त जेवणापुरता होता की काय, अशी चर्चा सुरू झाली. तर पालकमंत्री आले; पण कोणी नाही पाहिले, अशीच काहीसी परिस्थिती त्यांच्या दौऱ्याची झाली आहे.
कऱ्हाडची ओळख ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील शहर म्हणून आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असणाऱ्या कऱ्हाडला राजकीय पंढरी म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे सर्वच पक्षातील नेते दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक व्हायला वरचेवर येताना दिसतात. तर बऱ्याच राजकीय घडामोडींचे केंद्र कऱ्हाडच राहिल्याचे पाहायला मिळते. मात्र, जिल्ह्याच्या या पालकमंत्र्यांनी कऱ्हाडची ‘शिव’ बहुदा फारशी ओलांडलेली दिसत नाही. त्यामुळे येथील शिवसैनिकांच्यात शिवधनुष्य उचलण्यासाठी बळ कधी येणार? हा संशोधनाचा विषय आहे. वास्तविक, येथील शिवसैनिकांनाही पालकमंत्री आपले कधी वाटलेले दिसत नाहीत. त्यांच्या येण्याने वा जाण्याने कोणाच्या चेहऱ्यावर ‘हर्ष’ दिसत नाही. त्याचेच प्रत्यंतर आजही पाहायला मिळाले.
जिल्हा प्रमुखही अनभिज्ञ..
सातारा जिल्ह्यात फक्त पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र, शंभूराज देसाई अन् विजय शिवतारे यांच्यातील सख्य साºया जिल्ह्याला माहीत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनीही आपल्याला या दौऱ्याची माहिती नसल्याचे सांगितले.
कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी दुपारी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी
अल्पकाळ हजेरी लावली.