सतर्क प्रवाशांचा शेळ्यांभोवती पहारा
By admin | Published: March 9, 2015 09:41 PM2015-03-09T21:41:43+5:302015-03-09T23:49:51+5:30
बसस्थानकातील प्रकार : चोरट्यांपासून केले संरक्षण; मद्यपी मालक मात्र अनभिज्ञ
सातारा : दिवसाढवळ्या बघता-बघता हातचलाकी करून चोरी करण्याचे प्रकार हे बसस्थानकात होत असतात. यासाठी स्वत:बरोबर इतरांच्या साहित्याची काळजीही प्रवासी घेऊ लागले आहेत. त्याचाच प्रत्यय सातारा बसस्थानकात आला. एका मद्यापी आपल्या शेळ्या बसस्थानकात बांधून झोपला होता. या काळात अनेक भुरट्या चोरांच्या नजरा या शेळ्यांकडे होत्या; परंतु सतर्क प्रवाशांनी या शेळ्यांचे चोरट्यांपासून संरक्षण केले.
सोमवारी सकाळी एक मद्यापी तीन शेळ्या घेऊन बसस्थानकाच्या आऊटगेटवर आला. येथील जाहिरात फलकांच्या खांबाला या शेळ्या बांधल्या अन् तो मद्यपी तेथेच लुडकला. अगदी शेळ्या त्याला तुडवत होत्या. तरी त्याला भान नव्हते, काही भुरट्या चोरांनी या परिसरात हेलपाटे मारण्यास सुरुवात केली. ही गोष्ट काही प्रवाशांच्या निदर्शनास आली. त्यांनी जवळील प्रवाशांना याची कल्पना दिली. या दरम्यान काही एसटी कर्मचाऱ्यांनी याठिकाणी येऊन शेळ्या चोरीला जाऊ नये, याची दक्षता घेतली.
सातारा बसस्थानकात सकाळी ७ पासून ते १० वाजेपर्यंत या तीन शेळ्या बांधल्या होत्या. मद्यपीला नशेची गुंगी असल्याने त्याला याची जराही माहिती नव्हती. मात्र प्रवाशांनी आपले कर्तव्य पूर्ण केले. (प्रतिनिधी)
सर्वत्रच पोलीस पोहोचेल पाहिजे, असे नाही. यासाठी बाजारपेठ, बसस्थानक येथील नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे. जर नागरिकांनी एकसंध दाखविली तर चोऱ्यांचे प्रमाण कमी होईल.
- विजय जाधव, प्रवासी