पालकमंत्री, आमदारांना आत टाका!
By admin | Published: September 4, 2014 11:24 PM2014-09-04T23:24:35+5:302014-09-04T23:28:05+5:30
चार तासानंतर दोन गुन्हे दाखल
सातारा : ‘पालकमंत्री आणि आमदारांना लॉकअपमध्ये टाका. म्हणजे मला ‘ओके’ वाटेल,’ असे मिश्कील व्यक्तव्य करून खासदार उदयनराजे भोसले यांनी अनेकांच्या भुवया उंचाविल्या. त्यांच्या वक्तव्यामुळे पालकमंत्री शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. निमित्त होते शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या उद्घाटन सोहळ्याचे. राजकारण असो की, समाजकारण पण ; बुचकळ्यात टाकणाऱ्या वक्तव्यामुळे सातारचे खासदार उदयनराजे भोसले राज्याच्या राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत राहिले आहेत. गुरूवारीही असाच भन्नाट किस्सा घडला. उदयनराजे बोलण्यापूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उदयनराजे डायसच्या ठिकाणी उभे राहून बोलू लागले. ‘मला आश्चर्य वाटतंय. आमदार एवढे पोपटपंची करतायत. येथे जमलेले आयजी, बीजी, डीजी पुढची पदे मला माहिती नाहीत. तुम्ही मला समजून घ्या...’ असे म्हणत उदयनराजेंनी भाषणाची सुरूवात केली. शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजेंकडे बघत उदयनराजे म्हणाले, ‘अहो आयजी, या दोघांना लॉकअपमध्ये टाका म्हणजे मला ओके वाटेल.’ यावर सभागृहामध्ये एकच हशा पिकला.
उदयनराजे पुढे म्हणाले, या शाहूपुरी पोलीस ठाण्यामुळे गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होणार आहे. माझ्या मित्रांनी या पोलीस ठाण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांचा सत्कार या ठिकाणी व्हायला पाहिजे. शाहूपुरीवासीयांचे माझ्यावर प्रेम आहे. ‘आय लव्ह यू’ शाहूपुरीकर... असे म्हणून त्यांनी उपस्थिांना जिंकून घेतले. यानंतर त्यांनी आयोजकांना चिमटा काढला. ‘आता इथून जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही. या सगळ्यांना आत कोंडून ठेवा, वाटल्यास सभागृहाचे शटर बंद करा, पण जेवण ह्यांच्याकडून (व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांकडे बघत) घ्या.’ अशीही त्यांनी कोपरखळी मारली. उदयनराजे या कार्यक्रमामध्ये गमतीने बोलले असले तरी आयजी आणि पालकमंत्री मात्र अवाक् झाले. उदयनराजे केवळ दोन ते तीन मिनिटे बोलले. पण त्यांनी अख्या सभागृहाला पोट धरून हसायला लावले. कार्यक्रम संपल्यानंतर लोक सभागृहाबाहेर आले. यानंतर उदयनराजेंच्या भाषणाविषयी कुजबुज सुरू झाली. (प्रतिनिधी)
चार तासानंतर दोन गुन्हे दाखल
पहिल्याच दिवशी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा कोणाचा दाखल होतोय , याची अनेकांना उत्सुकता लागली होती. सकाळी साडेअकराला उद्घाटन झाल्यानंतर पोलीस कामाला लागले. दुपारपर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, चार वाजता दमदाटीचा पहिला अदखलपात्र गुन्हा नोंद झाला. अतूल विनोद घोईल (रा. सदर बझार) यांचे शाहू स्टेडीयम येथे कपड्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानामध्ये विजय भोसले, सुरज (किन्हई), अक्षय (रा. कोरेगाव) हे कपडे खरेदीसाठी आले. किमतीवरून त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर तिघांनी बघून घेतो, अशी धमकी देवून पलायन केले. दुसरी घटना राजवाड्यावर घडली. रोहिदास श्रीरंग जगताप (रा. रणदुल्लाबाद, कोरेगाव) यांचा मोबाइल गहाळ झाला. या दोन्ही घटना गुन्ह्यांमध्ये मोडत नाहीत, अदखलपात्र म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस डायरी पहिल्या दिवशी कोरी राहिली.