दुचाकी अपघातातील जखमी दाम्पत्याची पालकमंत्र्यांकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:05 AM2021-02-05T09:05:01+5:302021-02-05T09:05:01+5:30
औंध : वडी-त्रिमलीदरम्यान दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दाम्पत्य जखमी झाले. याचवेळी मार्डीकडे पालकमंत्री बाळासाहेब पाटील निघाले होते. अपघात झाल्याचे ...
औंध : वडी-त्रिमलीदरम्यान दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दाम्पत्य जखमी झाले. याचवेळी मार्डीकडे पालकमंत्री बाळासाहेब पाटील निघाले होते. अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वाहनांचा ताफा थांबविला व जखमी दाम्पत्याची चौकशी करून विचारपूस केली. त्यानंतर ते पुढे निघून गेले.
याबाबत माहिती अशी की, पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे माण तालुक्यातील मार्डीकडे जात असताना खटाव तालुक्यातील वडी-त्रिमलीजवळ नवीन काम झालेल्या रस्त्यावरून दुचाकी घसरून एका लहान मुलासह दाम्पत्य खाली पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ वाहनांचा ताफा थांबवून अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी मुलासह दाम्पत्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली. कोणाला काही दुखापत झाली आहे का याची देखील माहिती घेतली. यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची खात्री पटल्यानंतर मंत्री पाटील पुढच्या प्रवासासाठी रवाना झाले.
दरम्यान, साईडपट्ट्यांवर मुरूम टाकून अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.