पालकमंत्री-आमदारांत जुगलबंदी!
By admin | Published: January 11, 2016 11:18 PM2016-01-11T23:18:37+5:302016-01-12T00:31:07+5:30
राष्ट्रवादी-काँगे्रसकडून निधीवर आक्षेप : २११ कोटींच्या नियोजन आराखड्याला मंजुरी
सातारा : जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत पालकमंत्री विजय शिवतारे व इतर सदस्य, आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक जुगलबंदी झाली. आराखड्यातील पालकमंत्र्यांच्या वाट्यावर विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शंभूराज देसाई यांच्यासह इतर आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. वादळी चर्चेनंतर जिल्ह्याच्या २११.१० कोटींच्या नियोजन आराखड्याला सोमवारी मंजुरी देण्यात आली.
पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात प्रदीर्घ कालावधीनंतर नियोजन आराखडा मंजुरीची बैठक पार पडली. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख उपस्थित होते.
‘मागील वर्षीच्या १९८ कोटी इतक्या जिल्हा नियोजन आराखड्यात माझ्या प्रयत्नांमुळे ३० टक्के वाढ झाली,’ असे पालकमंत्री याही बैठकीत ठणकावून सांगत होते. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी, ‘पालकमंत्र्यांनी २११ कोटींच्या आराखड्यावर निधी मंजूर करून आणावा व त्याच्यावर वाटा सांगावा,’ असे स्पष्ट केले. त्यावर आ. शंभूराज देसाई यांनी ‘मागील आराखडा २५५ कोटींचा होता, त्यापेक्षा जास्त रकमेचा आराखडा पालकमंत्र्यांनी मंजूर करावा आणि त्यात आपला वाटा सांगावा,’ अशी सूचना केली. (पान ९ वर)
‘जिल्ह्याच्या आराखड्यात वाढ होण्यासाठी मी शासन पातळीवर संघर्ष करतो. जिल्हा आराखडा मंजूर करताना माझ्यावर उपकार करताय का,’ असा प्रश्न विचारला. त्यावर आ. शंभूराज देसाई यांनी तीव्र आक्षेप नोंदवीत, ‘उपकाराची भाषा पालकमंत्र्यांनी करू नये, निधी मंजूर करण्यासाठी बाकीचे आमदारही प्रयत्न करीत असतात. पालकमंत्र्यांनी शंभर टक्के प्रयत्न करावेत, हवी तर सर्व सदस्यांची मदत घ्यावी,’असे सांगितले. आ. मकरंद पाटील व आ. जयकुमार गोरे यांनीही पालकमंत्री एकाच ठिकाणी जादा कामे टाकत असल्याचा आक्षेप नोंदविला. यावर ‘मी प्रशासकीय काम करू का? पालकमंत्री म्हणून मला काही अधिकार आहेत की नाही, तुमच्या हक्कांवर अतिक्रमण होणार नाही, याची मी शाश्वती देतो,’असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या आदल्या दिवशी रविवारी पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्याची व्यूव्हरचना राष्ट्रवादीने आखली होती. याबाबतचा कानमंत्र रामराजे व आ. शशिकांत शिंदे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारची सभा वादळी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. या कानमंत्राचे स्पष्टीकरण सोमवारच्या सभेत आले. (प्रतिनिधी)
विश्रामगृहावर गुफ्तगू!
नियोजन समितीच्या बैठकीआधी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सोमवारी सकाळी साताऱ्यातील विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ही बैठक सुरू असताना विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे व इतर दुसऱ्या दालनात बसले होते. बैठक संपल्यानंतर पालकमंत्री स्वत: या दालनात येऊन रामराजे व शिंदेंशी चर्चा सुरू केली. ही चर्चा सुरू असतानाच आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले या दालनात दाखल झाले. या कमराबंद चर्चेत बऱ्याच विषयांवर जवळपास अर्धा तास गुफ्तगू झाले.