पालकमंत्री-खासदारांमध्ये कलगीतुरा
By Admin | Published: February 7, 2017 01:28 AM2017-02-07T01:28:01+5:302017-02-07T01:28:01+5:30
सिंहगडावर आयोजित केलेल्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमातच पालकमंत्री गिरीश बापट व खासदार संजय काकडे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला.
पुणे : सिंहगडावर आयोजित केलेल्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमातच पालकमंत्री गिरीश बापट व खासदार संजय काकडे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शहराध्यक्षांनी दोनच भाषणे होतील असे स्पष्ट केले. त्यावर आक्षेप घेत संजय काकडे यांनी दोन्ही खासदारही भाषण करतील, असे सांगितले. गिरीश बापट यांनी काकडे यांना अडवत ‘जे ठरले आहे, त्याप्रमाणे होऊ द्या,’ असे बजावले. शिवाय, आपल्या भाषणात त्यांनी काकडेंना बरेच चिमटेही काढले. ते म्हणाले, भाजपा हा विचाराने चालणारा पक्ष आहे. ही कोण्या सोम्यागोम्यांची, आल्यागेल्यांची पार्टी नाही. पक्षाच्या विचारांसाठी कार्यकर्त्यांनी आयुष्य खर्ची घातलेले आहे. त्याला कुणी हात लावू शकत नाही. बापटांचे हे वक्तव्य खासदार काकडेंना चांगलेच झोंबले, पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली नाही. पण प्रचाराच्या नमनालाच दोन नेत्यांमधील विसंवाद उघड झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. (प्रतिनिधी)
पारदर्शकतेची शपथ
महापालिका निवडणुकीतील भाजपाच्या सर्व उमेदवारांना सोमवारी सकाळी सिंहगडावर पारदर्शकतेची शपथ देऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. तिकीटवाटपातून निर्माण झालेली नाराजी झटकून आता पक्षाच्या विजयासाठी झटण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.