पालकमंत्र्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील आहाराची गुणवत्ता तपासण्याची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:40 AM2021-04-09T04:40:29+5:302021-04-09T04:40:29+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : दोन दिवसांपूर्वी अकोला येथे पालकमंत्री बच्चू कडू पाटील यांनी कोरोना सेंटरला भेट दिली होती. ...

Guardian Minister needs to check the quality of food in the sub-district hospital! | पालकमंत्र्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील आहाराची गुणवत्ता तपासण्याची गरज !

पालकमंत्र्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील आहाराची गुणवत्ता तपासण्याची गरज !

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : दोन दिवसांपूर्वी अकोला येथे पालकमंत्री बच्चू कडू पाटील यांनी कोरोना सेंटरला भेट दिली होती. तेव्हा रुग्णांना दिला जाणारा आहार, त्याची गुणवत्ता त्यांनी पाहिली व संबंधित विभागाचे वाभाडे काढले. त्याप्रमाणे सातारच्या पालकमंत्र्यांनीही कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयातील आहाराची गुणवत्ता तपासण्याची गरज आहे, अशी अपेक्षा वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

कऱ्हाडचे उपजिल्हा रुग्णालय कोविड करायचे की नाही, याबाबत कोरोनाच्या पहिल्या टप्प्यादरम्यान बरेच महिने खल झाला. अनेकांनी ते नाॅन कोविड असणे किती आवश्यक आहे, याची कारणमिमांसा केली. पण ‘लोकमत’च्या पाठपुराव्याने त्यातील काही भाग कोविड हॉस्पिटल म्हणून सुरू झाला. पण अनेक दिवस ऑक्‍सिजन उपलब्ध नसल्याने येथील व्हेंटिलेटर ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा अवस्थेत होते.

आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कऱ्हाडला नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यामुळे कऱ्हाडमध्ये सध्या तरी रुग्णांना लगेच बेड उपलब्ध होत आहेत. पण कोरानामुळे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना मिळणारा आहार चांगल्या नसल्याचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक खासगीत सांगत आहेत. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातही हीच अवस्था होती.

उपजिल्हा रुग्णालयातील आहार चांगला नसल्याची माहिती अनेक रुग्णांनी कुटुंबियांना भ्रमणध्वनीवरून कळवली आहे. त्यावर वाद न घालता नातेवाईकांनी आपल्या रुग्णाला घरून जेवणाचा डबा पोहोच करणे पसंत केले आहे. पण तो डबा रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठीही नातेवाईकांना कसरत करावी लागत आहे. पण सर्व रुग्णांच्या नातेवाईकांना घरून जेवणाचा डबा मिळणेही शक्य नाही. त्यामुळे त्यांना रुग्णालयात मिळेल तेच जेवण नाईलाजाने खावे लागत आहे.

पालकमंत्री बच्चू कडू पाटील यांनी अकोला येथे रुग्णांना मिळणाऱ्या आहाराची माहिती घेतली होती. यावेळी त्यांना नोंदीमध्ये अनियमितता दिसून आली तसेच अन्नाचा दर्जाही चांगला नसल्याचे लक्षात आले. त्यावर त्यांनी संबंधितांचा चांगलाच समाचार घेतला. खरंतर अशीच परिस्थिती जवळपास सर्वच शासकीय कोरोना केंद्रांवर पाहायला मिळेल, यात शंका नाही.

कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात असणाऱ्या कोरोना विभागातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. पण ‘मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची’ हा प्रश्न आहे. त्यामुळे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या कोरोना सेंटरला भेट देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. निदान त्यांच्या भेटीमुळे यापुढील काळात तरी रुग्णांना चांगला आहार मिळू शकेल. तेथील रुग्णांना मिळणाऱ्या आहाराचा दर्जा नेमका कसा आहे, याची खातरजमा केल्यास वस्तुस्थिती समोर येईल, यात शंका नाही.

चौकट

... मग कर्मचाऱ्यांचे जेवण दुसरीकडून कशासाठी?

उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना एका व्यक्तीकडून जेवण पुरवले जाते तर त्याच विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दुसऱ्या व्यक्तीकडून जेवण मागवले जाते. प्रश्न असा आहे की, रुग्ण आणि कर्मचारी या दोघांना एकाच व्यक्तीकडून जेवण का पुरवले जात नाही? या प्रश्नातच आहाराच्या गुणवत्तेचे उत्तर दडलेले आहे.

कोट:

कऱ्हाड येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांना चांगला आहार मिळत नाही, अशा नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. प्रशासनाने यात सुधारणा न केल्यास आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करणार आहे.

- अजित बानुगडे

जिल्हाध्यक्ष, प्रहार संघटना

फोटो : उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड

Web Title: Guardian Minister needs to check the quality of food in the sub-district hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.