‘बदलाच्या चर्चेत’ साताऱ्याचे पालकमंत्री
By admin | Published: January 24, 2016 12:10 AM2016-01-24T00:10:10+5:302016-01-24T00:10:10+5:30
हालचाली जोरदार : नाराज शिवसेना पदाधिकारी आक्रमक; रामदास कदमांना घाटावर आणण्याबाबतही चाचपणी
सातारा : जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याविरोधात जिल्ह्यातील शिवसेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी जोरदार रान उठवले आहे. पालकमंत्री शिवसैनिकांना विश्वासात घेत नाहीत, पक्षवाढीविषयीच्या चर्चांमध्ये मार्गदर्शन करत नाहीत, केवळ प्रशासकीय बैठकांसाठी साताऱ्यात येतात आणि निघून जातात, अशा तक्रारी नाराज मंडळींनी शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांकडे केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांना साताऱ्यात पाठविता येतील का, याबाबत शिवसेनाअंतर्गत चाचपणी सुरू झाली आहे.
पुरंदर मतदार संघातील शिवसेनेचे आक्रमक आमदार विजय शिवतारे गेल्या सव्वा वर्षापासून साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत आहेत. बारामतीकरांच्या साम्राज्याशी दोन हात करून विजय शिवतारे हे सलग दोन निवडणुकांमध्ये निवडून आले आहेत. राज्याच्या जलसंपदा खात्याचे मंत्रिपदही त्यांच्याकडे असल्याने शिवतारे अभावानेच साताऱ्यात दाखल होत असतात.
या संदर्भाने जिल्ह्यातील शिवसेनेच्या नाराज गटाने शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, खा. अनिल देसाई, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनीही नियोजन समितीच्या बैठकीत ‘पालकमंत्र्यांनी उपकाराची भाषा वापरू नये,’ असे
म्हणत घरचा आहेर दिला होता.
या पार्श्वभूमीवर नाराज मंडळींच्या हालचालींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील नाराज शिवसैनिकांच्या भावना
गटनेत्यांमार्फत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविल्या गेल्या असल्याने औरंगाबादचे
पालकमंत्री व शिवसेनेचे कोकणातील मुलूख मैदानी तोफ असणाऱ्या रामदास कदम यांच्याकडे साताऱ्याचे पालकमंत्रिपद सोपविण्याबाबत चाचपणी केली जात आहे.
पालकमंत्री विजय शिवतारे यांनी मात्र या चर्चेची कल्पना नसल्याची आणि केवळ चर्चा होत असेल तर पालकमंत्री म्हणून त्याला दाद देणे योग्य ठरणार नसल्याचे ‘लोकमत’ शी बोलताना स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पालकमंत्री बदलाचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार होणार असल्याने या निर्णयाकडे सातारा जिल्ह्यातील सर्व नाराज मंडळींचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
मनोरंजनामुळेच साताऱ्याची वाट लागली : शिवतारे
सातारा : जिहे-कटापूर योजना आणि साताऱ्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही दोन स्वप्ने मी सत्यात उतरवणार आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे मनोरंजन करणारे मागचे पालकमंत्री जिल्ह्यातलेच होते. त्यांनी जिल्ह्याची काय वाट लावली, हे सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे. मी त्यातला माणूस नाही. जे नाराज आहे, त्याला वैयक्तिक राजकारणाची किनार असून, मी पाकीट देणाऱ्यांच्या पंक्तीत बसलो असतो तर जिल्ह्यातील कामे मार्गी लागलीच नसती, ज्यांना माझी अडचण होतेय, तेच काही तरी वावटळ उठवत असून, मी त्याला भीक घालत नाही,’ असे स्पष्टीकरण पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘आर्थिक प्रलोभने पूर्ण करून वैयक्तिक एखाद्या माणसाला मोठे करायचे, पाकीट पद्धत बोकळवायची, ही संस्कृती माझी नाही. मी साताऱ्याचा पालकमंत्री झालो, हे अनेकांना रुचलेले नाही. दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारी जिहे-कटापूर योजनेची एकही वीट मागील पालकमंत्र्यांच्या काळात हालली नव्हती. या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता नसतानाही योजनेचे काम मी सुरू केले. काँगे्रस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्ह्यात काय दिवे लावले आहेत, हे जिल्ह्यातील जनतेला माहीत आहेत. आता चुकीच्या बातम्या पसरवून काही मंडळी माझी बदनामी करत आहेत.’
शिवसैनिकांच्या नाराजीबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, ‘माझ्याकडे राज्याचे जलसंपदामंत्रिपद आहे. पुरंदर मतदार संघाचे मी नेतृत्व करतो. त्यामुळे साहजिकच संपूर्ण राज्याची जबाबदारी माझ्याकडे असल्याने सातारा जिल्ह्यासाठी ज्यादा वेळ देणे अडचणीचे ठरते, तरीही मी जिल्ह्यातील महत्त्वाच्या कामांसाठी आग्रहाने वेळ देतो. मंत्रालय पातळीवरही माझी धावपळ सुरू असते. केवळ मनोरंजन करून वेळ घालण्याचे मला जमणार नाही. ज्यांना माझी राजकीय अडचण होतेय, त्यांना मी विशेष महत्त्व देत नाही.’