पालकमंत्र्यांची गाडी वादाला कारणीभूूत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2016 11:31 PM2016-01-08T23:31:00+5:302016-01-09T00:27:15+5:30
लाल दिवा कोणाचा? उत्सुकता शिगेला... ..वाद विकोपाला !
सातारा : दीड वर्षापूर्वी पालकमंत्र्यांच्या वाहनांचा कॉन्व्हॉय पक्ष कार्यालयात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी भवन गजबजून जात होते. आता मात्र हे वैभव राष्ट्रवादीकडे राहिलेले नाही. राष्ट्रवादी भवनासमोरून जाणाऱ्या इतर वाहनांचा कॉन्व्हॉय पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नसल्यानं कॉन्व्हॉय कुणाचा? याची उत्सुकता शिगेला पोहोचल्याने गुरुवारी दोन महिला पदाधिकाऱ्यांतील वाद विकोपाला गेला.
या वादाला कारण मात्र पक्षातील पद मिळण्याचेच होते. राष्ट्रवादी युवती सेलच्या निवडी झाल्या. या निवडीतील संघर्षामुळेच राष्ट्रवादी पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांच्या दोन गटांत वाद धुमसत होता. या वादाला उफाळून यायला पालकमंत्र्यांच्या वाहनाचे निमित्त झाले. राष्ट्रवादीच्या युवती सेलची बैठक झाली. बैठकीनंतर उपस्थित महिला राष्ट्रवादी भवनातून बाहेर पडत असतानाच पालकमंत्र्यांच्या वाहनांचा कॉन्व्हॉय समोरून गेला.
पालकमंत्रीच या वाहनातून गेले असल्याची चर्चा सुरू झाली.यातूनच दोघींमध्ये खडाजंगी झाली. मात्र, मुळात वाद होता तो युवती पदाधिकारी निवडीचा आणि या वादाला तोंड फुटले पालकमंत्र्यांच्या वाहनामुळे. शिवसेनच्या पालकमंत्र्यांची गाडी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोरून गेली तरी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये कालवाकालव सुरू होते. हे वास्तव यानिमित्ताने समोर आले.
राष्ट्रवादी काँगे्रसच्या महिला पदाधिकाऱ्यांतील वाद घडवून आणण्यासाठी पालकमंत्र्यांचे वाहनही पुरेसे असल्याची चर्चा यानिमित्ताने साताऱ्यात सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)
बदनामी कशाला?
कोणाविषयी काय बोलणे, हा संस्काराचा भाग आहे. पण बोलताना ज्या व्यक्तीचा वादाशी संबंधही नाही, अशा व्यक्तीची बदनामी कशासाठी करायची? सरकारने महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. या स्वातंत्र्याचा गैरवापर होऊ न देणे, ही प्रत्येक महिलेची जबाबदारी आहे. पक्षाच्या पदाधिकारी महिलांनी याचे भान राखणे आवश्यक आहे.
- सुवर्णा पाटील,
भाजप, शहराध्यक्षा
युवतींनी
काय बोध घ्यायचा?
युवती बैठकीसाठी युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राष्ट्रवादीच्या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवतीही या बैठकीला हजर होत्या. बैठक संपल्यानंतर काही युवती अभ्यासाला गेल्या; मात्र काहीजणी गर्दीत उभ्या होत्या. याचवेळी वाद सुरू झाल्याने या युवतींनी काय आदर्श घ्यायचा? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे, त्याचा अर्थ आपण असभ्य वर्तन करणे, असा नाही. आणि कोणत्याही महिलेने बोलताना अनेकदा विचार करावा. पालकमंत्री मग ते कोणत्याही पक्षाचे असू दे, राष्ट्रवादी पक्षीय कार्यालयापुढे झाले आहे. गुरुवारच्या घटनेने त्यांच्या पक्षाच्या संस्कृतीचे दर्शन त्यांनी घडवून आणले. दिलेल्या आरक्षणाचा जनहितासाठी वापर आवश्यक आहे.
- शारदा जाधव, शिवसेना, महिला जिल्हाध्यक्षा
सोन्याचे मणी सापडतायत का बघा!
राष्ट्रवादी भवनासमोर झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या हाणामारीत दोघींचे मंगळसूत्र तुटले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी या आवारात उभ्या असलेल्या एका घोळक्यामध्ये ‘सोन्याचे मणी सापडतायत का बघा,’ अशी चर्चा सुरू होती.