अधिकाऱ्यांकडे दोनशे गावांचे पालकत्व
By admin | Published: November 19, 2014 09:57 PM2014-11-19T21:57:35+5:302014-11-19T23:26:52+5:30
‘स्वच्छ भारत मिशन’ : कऱ्हाड तालुक्यातील वीस हजार ५६७ कुटुंबांना शौचालये बांधणीसाठी प्रवृत्त करणार
कऱ्हाड : ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राममध्ये लोकसहभागाद्वारे आघाडीवर आलेल्या कऱ्हाड तालुक्यात आता ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गंत शौचालये नसणाऱ्या कुटुंबांचे पालक अधिकारी म्हणून शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. १९८ गावांतील शौचालये नसणाऱ्या वीस हजार ५६७ कुटुंबांना नियुक्त केलेले तीन हजार नव्वद पालक अधिकारी उद्या (गुरुवार) गृहभेटीद्वारे शौचालये बांधणीस प्रवृत्त करणार आहेत.
कऱ्हाड तालुक्यात शासनाच्या ग्राम स्वच्छता अभियान, निर्मलग्राम योजनांसह विविध योजना आणि उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यश आले आहे. लोकाभिमुख योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरत असलेल्या कऱ्हाड पंचायत समितीच्या वतीने ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गंत विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. प्रत्येक घटकांना बरोबर घेऊन स्वच्छतेच महत्त्व पटविण्याचे काम सुरू केले आहे. ‘स्वच्छतेचे नायक आम्ही, स्वच्छतेचे पाईक आम्ही, चला करू स्वच्छ गाव,’ हे घोष वाक्य वास्तवात उतरवत तालुक्यातील १९८ गावांत लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ग्रामसेवक, तलाठी, वायरमन, अंगणवाडी कर्मचारी यासह सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी हे ‘स्वच्छ भारत’ अभियान लोकसहभागातून राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गंत पालक अधिकारी त्यांच्याकडे असलेल्या कुटुंबांना दि. २० नोव्हेंबरला प्रत्यक्ष भेट देऊन शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करणार आहेत. त्याचबरोबर दि. २६ जानेवारीपर्यंत शौचालये बांधून पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका व जिल्हास्तरावरून आपला साप्ताहिक आढावा व अहवाल घेण्यात येणार आहे. या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत शौचालये बांधल्यानंतर सर्व्हेत नाव असलेल्या कुटुंबास ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत बारा हजार रुपये तर सर्व्हेत नाव नसणाऱ्या कुटुंबांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून दहा हजार पाचशे रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. (प्रतिनिधी)
चला, करू स्वच्छ गाव...
कऱ्हाड तालुक्यात ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत शौचालय नसणाऱ्या कुटुंबांमध्ये जनजागृती करून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटविण्यासाठी सातारा जिल्हा परिषद व कऱ्हाड पंचायत समितीच्या वतीने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. शौचालये उभारण्यासाठी लोकचळवळ उभारून ‘चला, करू स्वच्छ गाव,’ हा नारा प्रत्येक गावागावात आणि वाडी-वस्तींवर पोहोचविण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी योगदान देत असल्याची माहिती सभापती देवराज पाटील व उपसभापती विठ्ठलराव जाधव यांनी दिली.
तीन हजार नव्वद पालक अधिकारी
कऱ्हाड तालुक्यातील ८८ हजार ५६४ कुटुंबांपैकी ६७ हजार ९९७ एवढ्या कुटुंबांकडे शौचालय आहे. उर्वरित शौचालये नसलेल्या वीस हजार ५६७ कुटुंबांना शौचालय बांधण्याची गरज पटवून देऊन, ते बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी अशी तीन हजार नव्वद पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली.
गावनिहाय पालक अधिकारी
जखिणवाडी : प्रांताधिकारी किशोर पवार
वारुंजी : पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे
मुंढे : तहसीलदार सुधाकर भोसले
पाल : सभापती देवराज पाटील
सैदापूर : उपसभापती विठ्ठलराव जाधव
गोटे : गटविकास अधिकारी अविनाश फडतरे
चचेगाव : पोलीस निरीक्षक नितीन जगताप
उंब्रज : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने
कार्वे : अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. कोरे