कवठेतील शेतकऱ्यांवर गुढीपाढव्याला ‘संक्रांत’
By admin | Published: March 29, 2017 01:06 AM2017-03-29T01:06:37+5:302017-03-29T01:06:37+5:30
लाखोंचं नुकसान : वीस गुंठे क्षेत्रातील ऊस शॉर्टसर्किटने तर बाराशे पेंढ्या कडबा जळून खाक
कवठे : गुढीपाडव्याच्या दिवशीच कवठे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात ऊस तर दुसऱ्या शेतकऱ्याचा कडबा जळून खाक झाला. ऐन दुष्काळात नुकसान झाल्याने त्यांच्यावर ‘संक्रांत’च आली आहे.
येथील चंद्र्रकांत तुकाराम ससाणे यांच्या डाळिंबाच्या शिवारातील २० गुंठे क्षेत्रातील ऊस शॉर्टसर्किटने जळाला तर दुसऱ्या घटनेत १२०० पैंड्या वैरण जळाली.
चंद्रकांत ससाणे यांच्या डाळिीब या शिवारात २० गुंठे ऊस होता. त्यापैकी लागणीचा ऊस नुकताच त्यांनी कारखान्यास दिला होता. तर बियाण्यासाठी पाचशेच्या आसपास ऊस राखून ठेवलेला होता. त्यांच्या याच शेतामध्ये विहीर असून, या शेतातून विद्युत वाहिनी गेलेल्या आहेत. मंगळवार, दि. २८ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास जोरदार वारा सुटला. यामध्ये विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा एकमेकांना चिकटल्या व शॉर्टसर्किट झाले. ठिणग्या उसामध्ये पडून नुकताच उगवलेला खोडवा व बियाण्यासाठी राखून ठेवलेला २० गुंठे क्षेत्रातील ऊस जाळून खाक झाला. शेतामध्ये ठिबक सिंचनासाठी टाकलेल्या पाईपसुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने अंदाजे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले. वीजवितरण कंपनी कवठेच्या वतीने शेताची पाहणी करून घटनास्थळाचे फोटो काढण्यात आले आहेत.
दुसऱ्या घटनेत शामराव ससाणे व मल्हारी ससाणे या दोघांची वैरण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही आग सोमवार, दि. २७ रोजी दुपारी एकला लागली. यामध्ये मल्हारी ससाणे यांनी सहाशे कडब्याची लावलेली गंज व शामराव ससाणे यांचा सहाशे पेंड्या कडबा जळाला. आगीचे कारण समजू शकले नाही. या आगीमध्ये अंदाजे ५० हजारांचे नुकसान झाले. आग निदर्शनास आल्यावर प्रचंड वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. वैरणीचे दर गगनाला भिडले असून, बाराशे पेंड्या कडबा जळाल्याने दुभत्या गुरांसाठी पुन्हा वैरण खरेदी करण्याची वेळ ससाणे यांच्यावर आली आहे. (वार्ताहर)