दुर्गम भागातील पक्क्या घरांसमोर उभारणार गुढी !
By admin | Published: March 22, 2017 10:54 PM2017-03-22T22:54:20+5:302017-03-22T22:54:20+5:30
प्रधान मंत्री आवास : राजेश देशमुख यांच्या सहिष्णुतेने मुनावळे ग्रामस्थ भारावले; चार कुटुंबे हक्काच्या घरात
सातारा : रविवार दिवस तसा सुटीचा ! वेळ सकाळी नऊची. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह दोन तासांच्या प्रवासानंतर मुनावळे गाठले. तेथून बोटीने प्रवास करत तासा दीड तासात अत्यंत प्रतिकूल आणि दुर्गम असणाऱ्या कारगाव, आंबवडे गावी भेट दिली. निमित्त होतं प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधून तयार असणाऱ्या घरकुलांच्या पाहणीचं !
जावळी तालुक्यातील प्रतिकूल, दुर्गम भागात प्रत्यक्ष भेट देऊन योजनांची पाहणी करणारे डॉ. देशमुख कदाचित पहिलेच मुख्य कार्यकारी अधिकारी असावेत. वर्षानुवर्षे साध्या छपरात राहणारे लाभार्थी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या नव्या पक्क्या घरकुलात प्रवेश करणार, याचा आनंद लाभार्थ्यांपेक्षा डॉ. देशमुख यांच्या चेहऱ्यावर जास्त दिसून आला.
प्रधानमंत्री आवास योजना केंद्र व राज्य शासन राबवित आहे. जावळी तालुक्यातील कारगाव व आंबवडे या गावात चार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. ही घरकुले अवघ्या अडीच महिन्यांत बांधून पूर्ण झाली आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला लाभार्थ्यांनी घरकुलासाठी लागणारे साहित्य बोटीतून आणून आपली वास्तू पूर्ण केली आहे, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.
‘गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी समन्वय ठेवून हीच कामे उत्तमरीत्या पार पाडली आहते. या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेसह, रोजगार हमी योजना आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाभ देण्यात आला आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर लाभाचे पैसे जमा करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आज हसू पाहून मला खूप प्रसन्न वाटत आहे,’ अशा शब्दात डॉ. देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शासनाच्या या विविध योजनांबाबत अधिकारी आणि लाभार्थी यांनी काही बोलक्या प्रतिक्रिया दिल्या.
जिल्ह्यात ४ हजार ५०० घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. आंबवडे व कारगाव या दुर्गम भागात घरकुले मंजूर केली आहेत. लाभार्थ्यांनी बोटीतून साहित्य आणून ३ महिन्यांच्या कालावधीत आपली घरे बांधली आहेत. येथे जास्तीत जास्त घरकुले मंजूर करण्याचा आमचा मानस आहे, असे जिल्हा विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
मी ४० वर्षांपासून जुन्या घरात राहत आहे. शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे मला चांगले घर मिळाले. यामध्ये आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १ लाख २० हजार, रोजगार हमी योजनेतून १७ हजार २८० रुपये व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १२ हजार रुपये असे असे एकूण १ लाख ४९ हजार २८० रुपयांचा लाभ देण्यात आला. या घरामध्ये मी आणि माझी पत्नी सुखाने व आनंदाने राहत आहे. जुन्या घरात पावसाळ्यात मोठा त्रास होत होता. या नवीन घरामुळे आता सुरक्षा निर्माण झाली आहे. नवीन घरासमोर गुढीपाडव्या दिवशी गुढी उभी करणार आहे.
- विठ्ठल झिमाजी कोकरे, लाभार्थी, कारगाव
माझे जुने मोडलेले घर होते. जिल्हा परिषदेच्या सहकार्याने तसेच गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या मदतीने माझे नवीन घर तयार झाले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेले पैसे आमच्या खात्यावर जमा झाले. घर बांधणीसाठी लागणारे साहित्य तापोळा, सातारा येथून बोटीने आणले व हे साहित्य डोक्यावरून वाहतूक करून घर बांधले.
- सखाराम कोंडिबा चव्हाण,
लाभार्थी, कारगाव
माझे घर पूर्णपणे मोडकळीस आले होते. आम्हाला प्रधानमंत्री योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले असून, लाभाचे पैसे आमच्या खात्यावर जमा झाले आहेत. शासनाच्या योजनेमुळे मला घर बांधता आले.
- धोंडिबा विठ्ठल माने, लाभार्थी, आंबवडे