गुप्तचर यंत्रणेचा एजंट म्हणवणारा तोतया जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:12 AM2021-03-13T05:12:16+5:302021-03-13T05:12:16+5:30
सातारा : महाराष्ट्र पोलीस दलातील उपनिरीक्षकाचा वेश परिधान करून गुप्तचर यंत्रणेचा (रॉ) एजंट म्हणून सांगणाऱ्या तरुणाला सातारा तालुका पोलिसांनी ...
सातारा : महाराष्ट्र पोलीस दलातील उपनिरीक्षकाचा वेश परिधान करून गुप्तचर यंत्रणेचा (रॉ) एजंट म्हणून सांगणाऱ्या तरुणाला सातारा तालुका पोलिसांनी हिसका दाखवीत अटक केली. संबंधित तोतया सातारा तालुक्यातील गवडीचा असून, नयन घोरपडे असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवार, दि. ११ रोजी दुपारच्या सुमारास सातारा-कास रस्त्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना देवकल येथे एक तरुण पोलीस उपनिरीक्षकाच्या वेशात दिसून आला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने रॉचा एजंट असल्याचे सांगितले, तसेच त्याच्याकडे पोलीस दलाबाबत माहिती घेतली; पण त्याला व्यवस्थित देता येत नव्हती. त्याच्याबाबत संशय आल्याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. मात्र, तो तोतयागिरी करीत असल्याचे लक्षात आले. संबंधिताचे नाव नयन राजेंद्र घोरपडे (वय २३, मूळ रा. गवडी, ता. सातारा, सध्या रा. शनिवार पेठ, सातारा), असे आहे. याप्रकरणी हवालदार सुजित भोसले यांनी तक्रार दिली आहे.
पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार सुजित भोसले, सागर निकम, सतीश पवार, नितिराज थोरात, महेंद्र पाटोळे, हेमंत शिंदे यांनी ही कारवाई केली.
......................................................