जमिनीसाठी गुरव समाजाचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:12 AM2021-03-04T05:12:46+5:302021-03-04T05:12:46+5:30
मलकापूर पालिकेने नवीन प्रशासकीय इमारत बांधलेली जमीन ही जुन्या सर्व्हे नंबर ५५८ मधील ११४ गुंठे गुरव समाजाच्या नावावर होती. ...
मलकापूर पालिकेने नवीन प्रशासकीय इमारत बांधलेली जमीन ही जुन्या सर्व्हे नंबर ५५८ मधील ११४ गुंठे गुरव समाजाच्या नावावर होती. त्यानंतर विचारात न घेता शासनाने बेकायदेशीरपणे ती पालिकेच्या नावावर केली आहे. संबंधित इमारतीचे बांधकामही अंतिम टप्प्यात आले आहे. त्या जमिनीसाठी आम्ही अनेकवेळा उपस्थित राहून वारंवार दाद मागूनही शासनाने योग्य न्याय दिला नाही. एकतर जमीन द्या, अन्यथा जमिनीचा मोबदला तर द्या, आशी मागणी करीत गुरव समाजातील कुटुंबांनी सोमवारी सकाळी पालिका कार्यालयासमोरच उपोषणासाठी ठिय्या मारला. मात्र, सध्या जमावबंदी आदेश असल्यामुळे तुम्हाला एकत्र बसता येणार नाही, अशी सूचना पोलिसांनी करताच गुरव समाजाचे उपोषण १५ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले.
यावेळी शिवाजी गुरव, अशोक गुरव, अरविंद गुरव, किरण पुजारी, मनीषा गुरव, राधिका गुरव यांच्यासह कुटुंबीय उपोषणास बसले होते. गुरव समाजाच्या उपोषणाला शेतीमित्र अशोकराव थोरात, सुधाकर शिंदे यांनी पाठिंबा दिला. पंधरा तारखेपर्यंत योग्य निर्णय न झाल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचे शिवाजी गुरव यांनी स्पष्ट केले.
फोटो :
कॅप्शन : मलकापूर पालिकेसमोर सोमवारी गुरव समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. (छाया : माणिक डोंगरे)