जीव मुठीत घेऊन गुरुजींचा डोंगर दऱ्यातील प्रवास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:39 PM2019-01-28T23:39:47+5:302019-01-28T23:40:00+5:30
प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : अंगाचा थरकाप उडविणारे निर्मनुष्य जंगल, झोंबणारा पाऊस, दहा फुटांवरही नीट दिसू ...
प्रगती जाधव-पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : अंगाचा थरकाप उडविणारे निर्मनुष्य जंगल, झोंबणारा पाऊस, दहा फुटांवरही नीट दिसू शकणार नाही असं धुकं आणि अशा थंडी वाºयातही घाम काढणारी डोंगराची चढण, रोज सुमारे २ तासांचा डोंगर चढून-उतरून, गुरुजी सातारा-पिसाडी (ता. जावळी) हा प्रवास करतात.
अथांग शिवसागर जलाशय, भोवती उंचच उंच डोंगररांगा, त्यातून जाणाºया लालमातीच्या वाटा आणि या वाटा तुडवत परिसरातून शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी हे चित्र साहित्यामधील प्रवास वर्णनामध्ये लोभस वाटू शकेल, तरी ते सुखावणारे निश्चित नाही. पिसाडी, पर्वत, गाडवली, ही जावळी-महाबळेश्वर तालुक्यांतील काही गावे. कास, तांबी, जुंगटीमार्गे कात्रेवाडीतून सुमारे हजार फुटांचा डोंगरकडा उतरून पिसाडीत जावे लागते.
याठिकाणी जाण्यासाठी शिक्षकाला जीवघेण्या दिव्यातून जावे लागते. पिसाडीला शिवसागरातूनही जाता येते. मात्र सरकारी बोट दुपारी बोमणोलीतून निघते. या बोटीची वेळ शाळेसाठी गैरसोयीची आहे. शिवसागर जलाशयाजवळ डोंगर खरोखरच्या पर्वतासारखा उंच आहे. महाबळेश्वर तालुक्यात हा भाग मोडतो. बामणोलीतून लाँचने वाघावळेत जायचं. त्यानंतर सुमारे दीड तास पायी डोंगर चढून गेल्यावर पर्वतच्या शाळेत शिक्षक पोहोचतो.
जीवावर उदार होऊन शिक्षकांचा प्रवास
कात्रेवाडीजवळच्या जंगलात सहा महिन्यांपूर्वी तीन अस्वलांनी केलेल्या हल्ल्यात एक वृद्ध जायबंद झाला. बचावासाठी झाडावर चढल्यानंतरही अस्वलांनी नख्यांनी बोचकरून त्यांच्या पायाचे लचके तोडले होते. घरातून बाहेर पडलेला माणूस पुन्हा घरी येत नाही, तोपर्यंत लोकांच्या जीवात जीव नसतो, ही स्थिती जशी पिसाडीच्या शिक्षकांची तशीच ती पर्वतच्या गुरुजींची आहे. कोसळता पाऊस आणि वाºयाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी गुरुजी स्वत:च्या जीवावर उदार होऊन रोजच्या या जंगलातून एकट्याने प्रवास करतात, हे विशेष!