गुरुजींच्या संघटनेत चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच!
By Admin | Published: May 29, 2015 09:55 PM2015-05-29T21:55:14+5:302015-05-29T23:47:38+5:30
प्राथमिक शिक्षक बँक निवडणूक : जागावाटपावरच ठरणार कोण-कोणाबरोबर असणार
कुडाळ : प्राथमिक शिक्षक बँकेत दर पाच वर्षांनी सत्तांतर घडत असते हा आतापर्यंतचा इतिहास आहे. गत पंचवार्षिक निवडणूकीत शिक्षक समितीने संघाच्या ताब्यातून सत्ता मिळविली होती. त्याला संघातील वाद हे मुख्य कारण होते. यावेळी हा वाद समितीच्या पथ्यावर पडू नये यासाठी शिवाजीराव पाटील प्रणित शिक्षक संघ संभाजीराव थोरात प्रणित शिक्षक संघाने एकत्र येवून ही निवडणूक लढवावी अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पाटील-थोरात गटात चर्चेत गुऱ्हाळ सुरू आहे.
दरम्यान, समितीदेखील सत्ता मिळविण्यासाठी पाटील गटाला तसेच दोंदे गटाला बरोबर घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र जागावाटपावरच कोण कोणाबरोबर जाणार हे ठरणार आहे.माजी आमदार शिवाजी पाटील प्रणित शिक्षक संघाने कऱ्हाड-पाटण शिक्षक सोसायटीत शिक्षक समितीबरोबर निवडणूक लढवून संभाजी थोरात गटाला पराभूत केले. तर शिक्षक बँकेतही अशी युती होणार अशी चिन्हे दिसत आहेत. जर समिती पाटील गटाबरोबर एकत्र येवून लढली तर संभाजीराव थोरात प्रणित शिक्षक संघाला सत्ता मिळविणे कठीण आहे. घटनादुरूस्तीमुळे बँकेचे संचालक कमी झालेले आहेत. तर गटरचना देखील बदलली आहे. गटरचना करताना समितीने आपल्याला सुरक्षित केले असले तरीही गत पंचवार्षीक निवडणूकीतील मतांची आकडेवारी पाहता संघातील दोन्ही गट एकत्र आल्यास समितीचे सत्तेचे मनसुबे धुळीला मिळतील. त्यामुळे शिक्षक समिती ही पाटील गटाला बरोबर घेण्यासाठी अधिक आग्रही आहे. तर थोरात प्रणित संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीक हे पाटील गटाशी चर्चा करून एकत्र लढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे शिवाजी पाटील प्रणित संघ हा सत्तेच्या समिकरणात महत्त्वचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे माजी आमदार शिवाजीराव पाटील प्रणित संघ हा आपल्याला जागा अधिक मिळाव्यात यासाठी आग्रही आहे. त्यामुळे शेवटी जागा वाटपावरच चर्चेच हे गुऱ्हाड थांबणार आहे. (प्रतिनिधी)
माजी आमदार शिवाजी पाटील प्रणित संघ सत्तेत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे आमच्या संघटनेला जो अधिक जागा देईल त्यांच्याबरोबर पाटील प्रणित संघ निवडणूक लढविणार आहे.
-तुकाराम कदम, राज्य कोषाध्यक्ष, पाटील प्रणित संघ
संघाची ताकद जिल्ह्यात मोठी आहे. संघात दोन गट असले तरीदेखील संघटनेत काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये कोणतीही द्वेश भावना नसल्यामुळे दोन्ही संघ एकत्र लढणार हे निश्चित आहे.
-मच्छिंद्र मुळीक, जिल्हाध्यक्ष थोरात प्रणित संघ
दोंदे गट आतापर्यंत ज्या संघटनेच्या बाजुने राहिला आहे. त्या गटाची सत्ता बँकेवर आली आहे. त्यामुळे जो-कोणी आम्हाला चांगली वागणूक देवून योग्य जागा देईल त्यांच्याबरोबर दोंदे गट राहील.
-दीपक भुजबळ, अखिल भारतीय शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष
किमान दोन जागा बिनविरोध होण्याची अपेक्षा...
शिक्षक बँकेसाठी पाटील प्रणित संघ, थोरात प्रणित संघ, शिक्षक समिती, दोंदे गट या सर्व शिक्षक संघटनांनी स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. मात्र वेळ, पैसा याची बचत व्हावी या उद्देशाने सर्व संघटनांनी किमान एक विचारावर एकत्र येवून दोन जागा तरी बिनविरोध करून एक चांगली सुरूवात करावी, अशी घोषणा सर्वसामान्य सभासदांमधून व्यक्त होत आहे.