गुरुजींनी केले राजकारण्यांना ‘ओव्हरटेक’
By admin | Published: May 21, 2015 10:10 PM2015-05-21T22:10:19+5:302015-05-22T00:18:00+5:30
२९५ अर्जांची विक्री : प्राथमिक शिक्षक बँकेसाठी १७ अर्ज दाखल
सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी २९५ अर्जांची विक्री झाली. १५ उमेदवारांनी १७ अर्ज दाखलही केले. जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी तब्बल २०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शिक्षकांनी बँकेच्या निवडणुकीत प्रस्थापित राजकारण्यांना ‘ओव्हरटेक’ करून राजकारणातला आपला रस दाखविला आहे.शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी बुधवार (दि. २१) पासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांच्याकडे १५ उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले. पहिल्याच दिवशी २९५ अर्ज विकले गेले. शांताराम बबन मासाळ (वाई सर्वसाधारण), संजय बाबूराव नांगरे (कऱ्हाड सर्वसाधारण २ अर्ज), किरण गुलाब यादव (कोरेगाव सर्वसाधारण २), शरद हणमंत बेस्के (आरळे सर्वसाधारण), विनोद गुलाब मोरे (रहिमतपूर सर्वसाधारण), विजय धर्माजी शिर्के (जावळी सर्वसाधारण), चंद्रकांत जयसिंग मोरे (मायणी सर्वसाधारण), सतीश सुरेश शिंदे (कोरेगाव सर्वसाधारण), नितीन शिवाजी शिर्के (कोरेगाव सर्वसाधारण), तुकाराम दादासो कदम (गिरवी तरडगाव सर्वसाधारण), ज्ञानेश्वर बबन कांबळे (अनुसूचित जाती जमाती), किरण गुलाब यादव (इतर मागास प्रवर्ग २ अर्ज), शांताराम बबन मासाळ (भटक्या जमाती), लतिका तुकाराम कदम (महिला राखीव), अशी अर्ज दाखल केलेल्यांची नावे आहेत.
बँकेच्या २१ संचालकांची यातून निवड केली जाणार आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार संचालक संख्या २८ वरून २१ वर आली असल्याने अनेकांनी संधी गमवावी लागणार आहे. तालुका मतदान संघातून १६, दोन महिला राखीव, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमातीमधून प्रत्येकी १ असे एकूण २१ संचालक निवडले जाणार आहेत. या निवडणुकीत ९ हजार ३५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुका मतदारसंघांमध्ये सातारा ३, कोरेगाव २, खटाव २, माण २, फलटण २, खंडाळा, वाई, जावळी, महाबळेश्वर तसेच कऱ्हाड-पाटण प्रत्येकी १ संचालक निवडला जाणार आहे. २५ मे पर्यंत अर्ज दाखल केले जाणार आहेत. २६ मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. १० जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान २१ जून रोजी तर मतमोजणी २२ जूनला साताऱ्यात आहे. (प्रतिनिधी)
९ हजार ३५४ मतदार
प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी ९ हजार ३५४ मतदारांची नोंद झाली आहे. हे मतदार २१ उमेदवार निवडून देणार आहेत.
खर्च मर्यादा १ लाख रुपये
बँकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला १ लाख रुपये इतक्या खर्चाची मर्यादा घालण्यात आलेली आहे. पॅनेल असेल तर हा खर्च विभागला जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांनी दिली.