गुरूकुल अन् अपशिंगे शाळा जिल्ह्यात अव्वल, जिल्हास्तराचा निकाल जाहीर
By प्रगती पाटील | Published: February 24, 2024 09:43 PM2024-02-24T21:43:57+5:302024-02-24T21:45:01+5:30
माझी शाळा स्वच्छ शाळा विभागासाठी समितीकडून शनिवारी पाहणी
सातारा : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्हास्तराचे निकाल जाहीर झाले आहेत. यात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये गुरूकुल स्कुल आणि शासकीय शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळा अपशिंगे यांनी बाजी मारली. या दोन्ही शाळांची विभागासाठी पाठविण्यात आल्या आहेत. या समितीकडून शनिवारी चार तासांची पाहणीही पूर्ण झाली आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात येणारे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय निकालांची घोषणा करण्यात आली. या अभियानांतर्गत शाळा व परिसराचे साैंदर्यीकरण, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम आदींची तपासणी तज्ज्ञ समितीच्यावतीने करण्यात आली. जिल्ह्यातील हजारो शाळांमधून खासगी ९ आणि सरकारी ९ शाळांची निवड तालुकास्तरासाठी करण्यात आली होती. यातील प्रत्येकी एक शाळा जिल्ह्यातून विभागासाठी पाठविण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातून गुरूकुल स्कुल आणि जिल्हा परिषद शाळा अपशिंगे या शाळांची विभागासाठी निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्ह्यातून हजारो शाळांना मागे टाकून गुरूकुल स्कुलने मिळविलेले यश हे पालकांच्या विश्वासाचे आणि शाळेतील प्रत्येक घटकाच्या कष्टाचे फलीत आहे. जे नवे ते हवे असं म्हणत नवनवीन संकल्पना राबवित शाळेचे मार्गक्रमण सुरू आहे. विभागीय पातळीवरही सातारा जिल्ह्याचे नाव उंचविण्यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्नशील राहील.
- राजेंद्र चोरगे, गुरूकुल स्कुल