गुरुकुल शाळेत विद्यार्थ्यांसमोर राडा !
By admin | Published: March 2, 2015 11:00 PM2015-03-02T23:00:35+5:302015-03-03T00:27:16+5:30
परस्परविरोधी तक्रारी : दिलीप येळगावकर, राजेंद्र चोरगे यांची गुन्ह्यात नावे
सातारा : संस्थांतर्गत कलहातून विद्यार्थ्यांसमोरच मारहाण, शिवीगाळ, दमदाटीचा प्रकार शाहूनगर-गोडोली येथील गुरुकुल स्कूलमध्ये सोमवारी घडला. यासंदर्भात परस्परविरोधी फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. एका फिर्यादीत मारहाण करणाऱ्यांमध्ये माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, येळगावकर यांनीही आपल्याला मारहाण झाल्याचे म्हटले आहे; मात्र त्यांनी यासंदर्भात तक्रार दिली नाही.गुरुकुल प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला नंदकुमार वेल्हाळ (वय ४८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्या केबिनमध्ये असताना सचिन गरगटे, दिलीप येळगावकर त्यांच्या केबिनमध्ये गेले आणि क्लार्क सायली केंडे व वासंती हिरवे यांना बाहेर जाण्यासाठी दमदाटी केली. ‘मी तुम्हाला ओळखत नाही,’ असे सांगून वेल्हाळ यांनी या दोघांना बाहेर जाण्यास सांगितले. तेवढ्यात अनोळखी सात-आठ व्यक्ती आत आल्या. त्यांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी वेल्हाळ, केंडे, हिरवे यांच्यासह शिपाई उषा बाचल, सुवर्णा मोरे, केशर साळुंखे यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली व शाळेबाहेर हाकलून दिले. नंतर गरगटे, येळगावकर व इतर लोक माध्यमिक शाळेच्या नव्या इमारतीत गेले. गेटवर गाडी लावून गेटला कुलूप लावू लागले. शाळेचे जनसंपर्क अधिकारी फरांदे, शिपाई संजय केंडे, वॉचमन मोकाशी यांनी विरोध केला असता गरगटे, येळगावकर व इतरांनी त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. माध्यमिकच्या मुख्याध्यापिका लीना संदीप जाधव यांच्याकडे जाऊन त्यांनी आणलेल्या पत्रावर सही करण्यास सांगितले. जाधव यांनी विरोध केल्याने गरगटे, येळगावकर यांनी फरांदे यांना मारहाण करून वेल्हाळ यांना धक्काबुक्की केली.
यानंतर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे तेथे आले आणि त्यांनी गरगटे, येळगावकर व इतरांना ‘शाळेत मुले आहेत, तुम्ही बाहेर जा’ असे सांगितले, परंतु हे सर्वजण तेथेच थांबले. त्यानंतर पोलीस तेथे आले आणि त्यांनी सर्वांना ताब्यात घेतले.
(आणखी वृत्त २ वर)