तब्बल सहा लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Published: September 24, 2015 10:26 PM2015-09-24T22:26:03+5:302015-09-24T23:57:11+5:30
शामगाव घाटात कारवाई : हैदराबादहून रत्नागिरीकडे चालली होती चोरटी वाहतूक
मसूर : हैदराबाद येथून रत्नागिरीकडे गुटख्याची चोरटी वाहतूक करणारा मालट्रक पकडून त्यातील ३५ पोत्यांतील सुमारे ६ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा गुटखा व अंदाजे १० लाख रुपये किमतीचा ट्रक असा सुमारे १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मसूर पोलिसांनी शामगाव घाटात गुरुवार, दि. २४ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास केली.याबाबत माहिती अशी की, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख व पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शामगाव घाटात नाकाबंदी केली होती. याचवेळी घाटात शामगावकडून कऱ्हाडकडे पांढऱ्या तपकिरी रंगाचा मालट्रक (एमएच ४३ वाय १४३५) निघाला होता. ट्रकबाबत संशय आल्याने वाहनचालक लक्ष्मण भगवान कदम याच्यासमोर तपासणी केली असता ट्रकमधील इतर मालांच्या पोत्याच्या पाठीमागे लपविलेला ३५ पोती गुटखा आढळला. त्यानंतर संबंधित ट्रक चालक व क्लिनरसह मसूर पोलीस दूरक्षेत्रात आणला. अन्नऔषध प्रशासन अधिकारी राजेंद्र काकडे व अन्नसुरक्षा अधिकारी यू. एस. लोहकरे , व्ही. बी. कोळे यांना माहिती दिली. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी दोन पंच व पोलिसांसमोर ३५ पोत्यांची तपासणी केली असता प्रत्येक बॅगमध्ये ५० पॅकेटमधील प्रत्येक पॅकेटमध्ये ६५ गुटख्याची पाकिटे आढळून आली. या गुटख्यावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली असल्याने गुटख्यासह मालट्रक जप्त करण्यात आला. राजेंद्र काकडे यांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे.
या कारवाईमुळे मसूर पोलिसांचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)
फोनवरील मागणीनुसार वाहतूक
निनावी फोनवरून आलेल्या व्यक्तीला हा गुटखा पोहोचविला जाणार होता. हा ट्रक मुंबई येथील अब्दुल वाहब शेख यांच्या मालकीचा असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या गुटख्याची किंमत सरकारी दरानुसार सहा लाख ८५ हजार रुपये असली तरी बाजारभावाप्रमाणे ४० लाख रूपये किंमत होत आहे.