मला धक्के देण्याची सवय;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:31 AM2021-01-09T04:31:58+5:302021-01-09T04:31:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : काम पूर्णत्चास गेलेला ग्रेड सेपरेटर सातारकरांसाठी कधी खुला होणार याची उत्सूकता सातारकरांना असतानाच खासदार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : काम पूर्णत्चास गेलेला ग्रेड सेपरेटर सातारकरांसाठी कधी खुला होणार याची उत्सूकता सातारकरांना असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळीच फीत कापून उद्घाटन केले. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले. तर याचवेळी पत्रकारांनी केलेल्या उद्घाटन अचानकपणे का या प्रश्नावर त्यांनी ‘मला धक्के देण्याची सवय आहे. कधी मी देतो, तर कधी मला बसतो. आदस से मजबूर हूँ,’ असेही दिलखुलासपणे सांगत हशा पिकविला.
वाहतूक कोंडीतून सातारकरांची सुटका करणाऱ्या पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे सेपरेटरच्या उद्घाटनाचीच प्रतिक्षा होती. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याला मुहुर्त मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण, खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळीच पाहणीसाठी गेल्यानंतर फित कापून ग्रेड सेपरेटर सातारकरांसाठी खुला झाल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी ग्रेड सेपरेटरमधून वाहनातून प्रवासही केला. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक अॅड. दत्ता बनकर, किशोर शिंदे, राजू भोसले, श्रीकांत आंबेकर, निशांत पाटील, मिलिंद काकडे, स्नेहा नलवडे, सविता फाळके, सीता हादगे यांच्यासह इतर नगरसेवक व सातारकर नागरिक उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, ‘साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर महत्वूपर्ण होता. यामुळे वाहतुकीची कोंडी टळणार आहे. हा ग्रेड सेपरेटर पूर्ण झाल्याने सातारा विकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेले वचन पूर्ण झालेले आहे. या सेपरेटरचे उद्घाटन झाले असून तो सातारकरांसाठी खुला झाल्याचे जाहीर करतो.
माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात नगरसेवकापासून झाली. पुढे आमदार, मंत्री आणि संत्रीही झालो. त्यानंतर खासदारही झालो. यासाठी सातारकरांनी नेहमीच मला सहकार्य केले, असेही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले.
चौकट :
सेपरेटर अभी के अभी खुला...
यावेळी पत्रकारांनी उदयनराजेंना ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केल्याने राज्यातील नेते नाराज होणार नाहीत का असा प्रश्न केला. यावर उदयनराजे म्हणाले, ‘जनता सुखी तर सर्व सुखी. मी फारसा कोणाचा विचार करत नाही. सर्वसामान्यांसाठी सेपरेटर आजच आणि अभी के अभी खुला झाला. सातारकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. सातारकरांची वचनपूर्ती झाली आहे. आम्ही करुन दाखवलंय. लोकांच्या विश्वासामुळेच हे शक्य झालं, असंही उदयनराजेंनी स्पष्ट केले.
चौकट :
७५ कोटी रुपये खर्च...
सातारा शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा, यासाठी पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू करण्यात आले होते. गेल्या पावणे तीन वर्षांपासून यंत्रणा कामाली होती. सुरुवातीला ६० कोटी रुपयांचे हे काम होते. मात्र, त्यानंतर गोडोलीकडे जाणाऱ्या मार्गाचे अधिक काम करण्यात आले. त्यासाठी अतिरिक्त १५ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यामुळे संपूर्ण ग्रेड सेपरेटरचे काम हे ७५ कोटींवर गेले.
फोटो ०८ग्रेड सेपरेटर...
फोटो ओळ : सातारा येथील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनरागध्यक्ष मनोज शेंडे, अॅड. दत्ता बनकर, निशांत पाटील आदी उपस्थित होते. (छाया : जावेद खान)
........................................................................