मैत्रिणीशी चॅटिंग केल्याच्या रागातून फिशिंगद्वारे हॅक; महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्टप्रकरणाचा अखेर छडा
By दीपक देशमुख | Published: September 1, 2023 05:21 PM2023-09-01T17:21:12+5:302023-09-01T17:21:22+5:30
एकास अटक
दीपक देशमुख
सातारा : मैत्रिणीशी चॅटिंग करत असल्याच्या रागातून एका युवकाने फिशिंगद्वारे संबंधित अल्पवयीन युवकाचा इन्स्टा आयडी व पासवर्ड मिळवला. त्यानंतर त्याच अकाउंटवरून दि. १५ ऑगस्टला महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली जेणेकरून अल्पवयीन मुलाची बदनामी व्हावी व मैत्रीणीपासून दूर व्हावा. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून कोरेगाव तालुक्यातील संशयिताला अटक केली आहे.
याबाबत माहिती एका अल्पवयीन युवकाच्या इस्टाग्राम अकाउंटवरून महापुरुषांच्या नावाने आक्षेपार्ह पोस्ट दि. १५ ऑगस्टला प्रसारीत झाली हाेती. यामुळे जिल्ह्यामध्ये वातावरण तंग झाले होते. यामुळे याची गांभिर्याने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेने संबंधित युवकाच्या इस्टाग्राम अकाउंटची तांत्रिक माहिती प्राप्त केली. या माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले असता कोरेगाव तालुक्यातील एका संशयिताचे नाव तपासात समोर आले.
संशयितास ताब्यात घेवून चाैकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. संशयित युवकाची मैत्रिण अल्पवयीन युवकाच्या इस्टाग्रामवर संपर्कात होती. त्याचा राग मनात धरून संशयिताने इस्टाग्रामावर आरोही या नावाने बनावट इस्टाग्राम अकाउंट तयार केले.
त्यावरून अल्पवयीन युवकाशी चॅटिंग करून त्याचा विश्वास संपादन केला. यानंतर संशयिताने त्याच्याकडून इस्टाग्रामचा आयडी व पासवर्ड प्राप्त करून घेतला. आयडी व पासवर्ड मिळालेल्या अकाउंटवरून संशयिताने दि. १५ रोजी महापुरुषांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली. लोकांनी अल्पवयीन युवकास शिवीगाळ करावी, त्याची बदनामी व्हावी, त्यास शिक्षा मिळावी व तो त्याच्या मैत्रिणीपासुन दुर व्हावा, या हेतुने त्याने असा प्रकार केल्याचे समोर आले आहे.